विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नैऋत्य मोसमी पावसाने यंदा ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. देशाच्या वायव्य भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेसह ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिपावसामुळे पेरण्या थांबल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत खरिपाच्या पेरण्या ११ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. यावर्षी एक जून ते सात जुलैदरम्यान पाऊस सामान्यपेक्षा कमी झाला आहे. त्याचा थेट परिणाम खरिपाच्या पिकांवर होऊ लागला आहे.
महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोमवारी (१२ जुलै) दमदार पाऊस झाला असला तरी उत्तर महाराष्ट्रावर यंदा पाऊस रुसला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असली तरी तो पुरेसा नाही.
असमतोल पाऊस
काही राज्यांच्या विशिष्ठ काही भागात जोरदार पाऊस होत असला तरी अन्य भागात पावसाची मोठीच ओढ आहे. ही परिस्थिती जवळपास सर्वच राज्यांमध्ये आहे. जम्मू मध्ये तर पावसाने गेल्या ३२ वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे. तर, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांच्या अनेक भागात पावासाची मोठी प्रतिक्षा आहे.
दोन पावसातील अंतर
पाऊस पडल्यामुळे शेतकरी उत्साहात पेरणी करतात. मात्र, गेल्या काही वर्षात दोन पावसातील अंतर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पेरणी झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पावसाची मोठी प्रतिक्षा करावी लागते. अनेकदा दुबार पेरणीचे संकटही ओढवते आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पश्चिम भागात पावसाची ओढ
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात मॉन्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊ शकतो. परंतु कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस नसल्यासारखाच पडला आहे. या राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबून पुढे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. खरिपाची पिके बहुतांश पावसावरच अवलंबून असतात. अशीच परिस्थिती दक्षिण भारतातच कमी-अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे.
पूर्वेकडे अतिवृष्टी
यंदाच्या मोसमात पूर्वेकडील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि बंगालमध्ये सामान्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे मातीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. चालू मोसमात एकूण ४.९९ कोटी हेक्टर क्षेत्रात पेरण्या झालेल्या आहेत. गेल्या वर्षी याच मोसमात ५.५८ कोटी हेक्टरच्या तुलनेत जवळपास ११ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. पावसावर अवलंबून असलेल्या पिकांच्या पेरण्या १५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. भात पिकाची पेरणी ११.२६ टक्क्यांनी कमी झालेली आहे. ज्या पूर्वेकडील राज्यात अतिपाऊस झाला तिथे भाताची पेरणी होऊ शकली आहे.
सिंचनाची अपुरी व्यवस्था
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यापासून देशभरात समान ढग अच्छादित राहून चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊ शकेल. देशात पुरेशा प्रमाणात सिंचनाची व्यवस्था नसल्याने अजूनही ६० टक्के शेती नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असते. पावसाने ओढ दिली तरी खरीप हंगामावर अधिक परिणाम होणार नाही, असा दावा कृषी मंत्रालयाने केला आहे. पुढील काही आठवड्यात चांगला पाऊस होऊन शेतीविषयक व्यवहार वेगाने होतील, असा आशावाद कृषी मंत्रालयाने व्यक्ते केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील खरिपाची स्थिती
जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ३१ टक्के खरिपाची पेरणी झाली होती. काही दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे पेरण्यांचे क्षेत्र ४८.३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. भाताच्या रोपांसाठी अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने आदिवासी भागातील पेरण्यांना वेग येणार नसल्याचे चित्र आहे.