वॉशिंग्टन – प्रत्येकाच्या आयुष्यात बरे-वाईट दिवस येतात. त्यालाच आयुष्य असे नाव. पण कोरोना महामारीने जगभरातील बहुतांश सर्वच जणांना वाईट काळातून जावे लागत आहे. शंभर वर्षांनंतर येणार्या या महामारीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. आर्थिक नियोजन विस्कळित झाले. एक वेळ आर्थिक परिस्थिती पुन्हा सुधारण्यास वाव असतो. परंतु गेलेला व्यक्ती पुन्हा येत नाही. हे दुःख आयुष्यभर घेऊन जगावे लागते. त्यातही लहान मुलांनी आपल्या पालकांना गमावले असेल तर हे दुःख किती मोठे असेल. तिथे शब्द कमी पडतील.
कोरोना विषाणूने लाखोंच्या संख्येने लहान मुलांना अनाथ केले आहे. लॅसेंट नियतकालिकेत प्रसिद्ध एका अहवालानुसार, कोरोनाच्या पहिल्या १४ महिन्यांमध्ये जगभरातील २१ देशांमधील १५.६२ लाख मुलांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरवले आहे. यामध्ये देशातील १,१६,२६३ मुलांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग एब्यूज (एनआयडीए)च्या अहवालानुसार, भारतात २५,५०० मुलांनी आपल्या आईला तसेच ९०,७५१ मुलांनी वडिलांना गमावले आहे. तर १२ मुलांनी दोन्ही पालकांना गमावले आहे.
जगभरात ११.३४ लाख मुलांनी आपल्या पालकांना किंवा त्यांची देखरेख ठेवणार्या आजी-आजोबांना कोरोना विषाणूमुळे गमावले आहे, असा अंदाज संशोधनात लावण्यात आला आहे.
त्यामध्ये १०.४२ लाख मुलांनी आई-वडिलांना गमावले आहे. बहुतांश मुलांनी आई किंवा वडिलांना गमावले आहे. दोन्ही पालकांना गमावणार्या मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक देशात महिलांच्या तुलनेत अधिक पुरुषांचा मृत्यू झाल्याचेही संशोधनात उघड झाले आहे.
सहा देशात सर्वाधिक अनाथ
एनआयएचच्या अहवालानुसार, दक्षिण अफ्रिका, पेरू, अमेरिका, भारत, ब्राझील आणि मेक्सिकोमध्ये सर्वाधिक मुले अनाथ झाली आहेत. भारतातील २,८९८ मुलांचे पालनपोषण करणारे आजी-आजोबांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सर्वेक्षणात आढळली आहे.
नऊ मुले अशी आहेत ज्यांनी आपल्या पालकांना महामारीमुळे गमावले आहे. भारतात प्रति एक हजार मुलांपैकी ०.५ टक्के मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे. पेरूमध्ये १४.१, दक्षिण अफ्रिका ६.४, ब्राझील ३.५, रशिया २.० तर अमेरिकेत १.८ टक्के मुलांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरविले आहे. पालकांना गमावलेल्या मुलांमध्ये नशेच्या आहारी जाण्याची भीती एनआयडीएच्या संचालिका नोरा डी. वॉलकोव्ह यांनी व्यक्त केली आहे.