ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा आता आत्यंतिक गरजेचा झाला आहे. परंतु अनेकदा विमा कंपन्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात. ठाणे जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. कोविड काळात एका व्यक्तीने आरोग्य विमा काढला होता. परंतु त्याला संबंधित विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची चौकशी करून ग्राहक न्यायालयाने संबंधित विमा कंपनीला विम्याची रक्कम ग्राहकाकडे तातडीने सुपूर्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सन२०२० मध्ये कोविड रुग्णाला कल्याणातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाकडे विमा कंपन्यांचा हेल्थ इन्शुरन्स असून त्याला रुग्णालयातील बिलाची रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे त्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर वेळोवेळी सुनावणी होऊन विमा कंपनीसह थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटरला ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने तीन लाख ४३हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश देत, विमा कंपनीला दणका देणारा निकाल दिला आहे.
दोन वर्षापूर्वी कोविडचा उद्रेक झाला होता. त्या उद्रेकमध्ये कल्याण शहरात रहिवासी जयेश द्वारकादास राजा यांनाही कोविड आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर कल्याण पश्चिम भागातील रिद्दी हॉस्पटिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी १ ते १२ जुलै २०२०पर्यत ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या उपचाराचे एकूण बिल ४ लाख ४७ हजार ७७१ रुपये झाले होते. त्यानंतर विमा कंपनीने त्यांना केवळ १लाख ३४ हजार रुपये मंजूर केले होते. त्यावर राजा यांनी आक्षेप घेत ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाकडे विमा कंपनी विरोधात दावा दाखल केला.
या दाव्यावर ६ एप्रिल २०२२ रोजी अंतिम सुनावणी झाली. या दरम्यान राजा यांनी हॉस्पिटलच्या ३ लाख १३ लाख ७७१ दाव्याची शिल्लक रक्कम आणि त्याच्या मानसिक छळाची आणि खटल्याच्या खर्चाची नुकसान भरपाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी ग्राहक मंचाकडे केली. विशेष म्हणजे राजा यांनी फेब्रुवारी २०२०ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीसाठी मेडिक्लेम विमा पॉलिसी मिळवली होती. त्यांच्या विम्याची रक्कम ५ लाख २५हजार रुपये असल्याचे पुरावे त्यांनी ग्राहक न्यायालयात दिले.
पॉलिसीची विमा रक्कम ५ लाख २५ हजार रुपये असल्याने, तक्रारदार राजा यांना एकूण दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार होता. त्यामुळे, ग्राहक मंचाने दोन्ही विमा कंपनींना ३ लाख १३हजार७७१ रुपये शिल्लक दाव्याची रक्कम तसेच वार्षिक १० टक्के व्याजासह रक्कम वसूल होईपर्यंत देण्याचे निर्देश दिले. तसेच विमा कंपन्यांनी तक्रारदार राजा यांना मानसिक त्रास व छळासाठी २० हजार आणि कार्यवाहीच्या खर्चापोटी १०हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचा यांनी दिले आहे. थोडक्यात काय तर ग्राहक हा राजा असतो हे राजा यांच्या प्रकरणावरून दिसून येते
Covid Mediclaim Reject Consumer Forum Order