विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. काही राज्यात रुग्णसंख्या घटू लागल्याने हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. एक जूनपासून काही ठिकाणी दिलासा मिळू लागला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र काही राज्यांमध्ये लॉकडाउन वाढविण्यात आला आहे.
महाराष्ट्र
राज्यात ब्रेक दी चेन अंतर्गत १४ एप्रिलपासून लागू करण्यात आलेले निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार आहेत. तिसर्या लाटेचा धोका ओळखून राज्यात अंशतः लॉकडाउन कायम राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात रुग्णसंख्या घटू लागल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक जूनपासून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत शनिवार, रविवार वगळून आठवड्यात ५ दिवस दुकानांना खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ६०० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही. राज्यात रात्रीची संचारबंदी कायम राहील.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. संर्गाचा दर पाहून राज्यात कोरोना संचारबंदी किंवा निर्बंध राहणार आहेत. ५ टक्क्यांहून अधिक संसर्ग असलेले आणि ५ टक्क्यांपेक्षा कमी संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होणार आहेत.
राजस्थान
राजस्थानमध्ये बुधवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होत आहे. राज्याच्या गृहविभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याअनुसार, शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून मंगळवारी सकाळी पाच वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू कायम राहणार आहे. इतर दिवशी दुपारी बारापासून दुसर्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील.
जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये ३१ मेपासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध भागातील बाजार आणि परिसर आलटून-पालटून खुले राहणार आहे. सार्वजनिक परिवन व्यवस्था क्षमतेच्या ५० टक्के सुरू राहणार आहे. तीन दिवस सलून दुकाने आणि पार्लर सुरू राहतील. तीन दिवस मद्याची दुकाने सुरू असतील. इनडोअर मॉल क्षमतेच्या २५ टक्के खुले राहणार आहेत. रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी सुरू राहील.
दिल्ली
दिल्लीमध्ये सोमवारपासून लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. लॉकडाउन सात जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून कोरोना संचारबंदी कायम राहणार आहे. बंद परिसर आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेर उद्योग तसेच बांधकाम व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे.
पंजाब
पंजाबमध्ये कोरोना संचारबंदी १० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोना निर्बंधाचा अवधी वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गुरुवारीच केली होती. १० जूनपर्यंत कोरोना निर्बंध लागू राहणार आहे.
बिहार
बिहारमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन पुन्हा वाढविण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यात ८ जूनपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. परंतु व्यावसायिक कामांना सवलत देण्यात आली आहे.
उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये ८ जूनपर्यंत कोरोना संचारबंदी वाढविण्यात आली आहे. त्यात काही सवलतही देण्यात आली आहे. अन्नधान्यांच्या दुकानांना दोन दिवस आणि स्टेशनरी दुकानांना एक दिवसासाठी सवलत देण्यात आली आहे. आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशमध्ये ७ जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत. आवश्यक वस्तूंची दुकाने पूर्वीप्रमाणेच खुली राहतील. इतर दुकानांना पाच तासांसाठी खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हरियाणा
हरियाणामध्ये ७ जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. यादरम्यान दुकाने आता सकाळी ९ पासून दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. दुकानदारांना सम-विषम फॉर्म्युल्याचे पालन करावे लागेल. शिक्षण संस्था १५ जूनपर्यंत बंद राहतील. रात्री १० ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू राहील.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये १५ जूनपर्यंत कोरोना निर्बंध लागू राहणार आहेत. बंगालमध्ये निवडणुकीनंतर कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आले.
झारखंड
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यात ३ जूनपर्यंत लॉकडाउन लागू ठेवण्याची घोषणा केली आहे.
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश
तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये लॉकडाउन ७ जूनपर्यंत लागू राहणार आहे. केरळ सरकारने अत्यावश्यक सेवांना सूट देऊन लॉकडाउन ९ जूनपर्यंत वाढविला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी राज्यात ७ जूनपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशात १० जूनपर्यंत संचारबंदी वाढविली आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली. तेलंगणामध्ये १० दिवसांसाठी लॉकडाउन वाढविला आहे.