नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. दररोज वाढत्या रुग्णसंख्या आणि मृत्युमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सध्याच्या आकडेवारीने देशातील कोरोना रुग्णसंख्येचे मागील सर्व विक्रम मोडित काढले आहेत. गेल्या २४ तासात २.७४ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून, १,६१९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झालेल्या राज्यांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात सर्वाधिक २,७३,८१० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १,५०,६१,९१९ झाली आहे. तर १,६१९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १,७८,७६९ वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत आढळलेल्या रुग्णसंख्येत ही सर्वाधिक संख्या आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये कोरोना महामारीमुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. कोरोनाने सर्वाधिक बाधित झालेल्या लखनऊ, कानपूर, गोरखपूर, प्रयागराज आणि वाराणसीमध्ये पूर्ण लॉकडाउ लावण्याचे आदेश दिले आहेत. आदेशांनुसार, सोमवारी रात्रीपासून ते २६ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तसेच राज्यात पंधरा दिवसांचा लॉकडाउन लावण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत.
दिल्ली
दिल्लीत कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता अरविंद केजरीवाल सरकारने राजधानीत ६ दिवस लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्रीपासून २६ एप्रिलला सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी असेल. दिल्लीत कोरोनारुग्णसंख्येचा दर ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रविवारी २५४६२ नवे रुग्ण आढळले होते. लॉकडाउनकाळात वैद्यकीय व्यवस्थेसह, खाण्या-पिण्याच्या सेवा सुरू राहणार आहेत.
राजस्थान
राजस्थान सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. या वेळी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. राजस्थान सरकारने रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. राज्यातील दुकाने ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची सूट दिली आहे. तसेच सायंकाळी ६ वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. आता संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ३ मेपर्यंत कठोर निर्बंध लागू असतील.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात येत्या ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याने कडक लॉकडाऊन लागू होण्याची चिन्हे आहेत.