मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. त्यामुळेच बंदिस्त कार्यक्रमांमध्ये मास्क घालण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गेल्या काही दिवसात लक्षणीयरित्या बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच सुरू होणाऱ्या शाळांबाबत काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मंत्री गायकवाड म्हणाल्या की, कुठल्याही परिस्थितीत शाळा सुरूच राहतील. मात्र, कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्याबाबत योग्य ती नियमावली जाहीर केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाईल. सर्व ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू ठेवल्या जातील. मात्र, मास्क सक्ती करायची की नाही याबाबत येत्या काही दिवसातच निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
या तारखेपासून शाळा सुरू होणार
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार दि. १३ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या परवानगीने घेता येईल. तथापि, माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.
आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील, असेही या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.