नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महामारीची दुसरी लाट इतकी धोकादायक आहे की रुग्णांची सेवा करणार्या डॉक्टर आणि इतर स्टाफलासुद्धा कोरोनाची बाधा होत आहे. देशात अनेक कारणांनी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु त्यातील प्रमुख दोन कारणांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशी माहिती दिल्लीमधील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जेव्हा लसीकरण सुरू झाले आणि रुग्णांची संख्या कमी झाली, तेव्हा लोकांनी कोरोनाचे नियम पाळणे बंद केले. आज हा डबल म्युटेंट विषाणू वेगाने पसरत आहे. त्याचा परिणाम देशातील आरोग्य व्यवस्थेवरसुद्धा झालेला आहे. रुग्णसंख्येचा वेग पाहता आपल्याला बेड आणि इतर सुविधा वाढवणे आवश्यक आहे. आपल्याला तत्काळ कोविड रुग्णसंख्या कमी करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सध्या आपल्या देशात अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. तसेच निवडणुकाही सुरू आहेत. जीवनही महत्त्वाचे आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे. धार्मिक भावना दुखावणार नाही आणि कोविडच्या नियमांचे पालन होऊ शकेल असे आपले वर्तन असावे.
६-७ महिन्यांपूर्वीच्या तुलनेत सध्या दिल्लीत मोठी रुग्णसंख्या वाढली आहे. आरोग्यसुविधा आणि संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्वी केलेल्या व्यवस्थेप्रमाणे आताही तशीच व्यवस्था करावी लागणाल आहे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.