नवी दिल्ली – परदेशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सणासुदीच्या काळात कोविडच्या चाचण्यांमध्ये घट दिसून आली आहे. त्यामुळे सहाजिकच दररोज आढळणार्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु कोविड मृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. वर्डोमीटर्सच्या माहितीनुसार देशात शनिवारी ११,६८० नवे रुग्ण आढळले असून ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात ५० हजार रुग्ण आढळत असतानासुद्धा मृत्यूचे प्रमाण इतकेच होते. चाचण्या वाढविल्या गेल्या नाही तर बाधित रुग्णांचे वेळेवर निदान होऊ शकणार नाही. परिणामी परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चाचण्यांमध्ये शिथिलता
ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यापासून दररोज होणार्या चाचण्यांमध्ये शिथिलता येऊ लागली आहे. नवरात्रीच्या काळात देशभरात अनेक लहान-मोठ्या पर्वांची सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या भेटीगाठी वाढल्या असून बाजारात गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्या आणि ट्रेसिंग वाढविण्याची गरज होती. परंतु या कामातच शिथिलता दिसून आली.
दररोज १० लाखांच्या आतच चाचण्या
देशात दररोज सरासरी १५ लाखांहून अधिक चाचण्या होत होत्या. काही दिवसांमध्ये तर २०-२० लाख नमुन्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये दररोज सरासरी १० लाख चाचण्याच होऊ शकल्या आहेत. देशात शनिवारी २४ तासांच्या आत ८.१० लाख नमुन्यांची चाचण्या झाल्या आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी चाचण्या केल्या गेल्या तर बाधितांचा शोध घेणे कठीण होईल. ही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल ठरेल आणि परिस्थिती गंभीर होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
निष्काळजीपणा वाढला
तारीख दररोज चाचण्या
१ ऑक्टोबर १५.१७
६ ऑक्टोबर १८.५३
१२ ऑक्टोबर १३.२५
१८ ऑक्टोबर ११.८१
२४ ऑक्टोबर ९.९८
३० ऑक्टोबर १२.५७
६ नोव्हेंबर ८.१०
(स्रोत – कोविड १९ इंडिया डॉट कॉम)
चाचण्यांमध्ये भारत पाचव्या स्थानावर
देश नमुने चाचण्या (प्रति १००० नागरिक)
डेन्मार्क १७४५
इटली १२२०
कॅनडा ८६३
न्यूझीलंड ८५०
भारत ४३८