कोलकाता (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढत असतानाच आता अत्यंत महत्वाच्या व नामांकित अशा शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना देखील कोणाची लागण झाली आहे. प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था IIT खरगपूरमध्ये 60 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्याचवेळी, कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) चे वसतिगृह कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
IIT खरगपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान किमान 62 जण कोविड-19 साठी पॉझिटिव्ह निघाले आहेत. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. तर, आयआयएममध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांत किमान 35 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी बहुतेक जणांना सौम्य लक्षणे जाणवत असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारने रामानुजन, लेक व्ह्यू आणि न्यू हॉस्टेल आणि टाटा हॉल ही तीन वसतिगृहे आधीच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. बाधित रुग्णांना येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या 144 वॉर्डांपैकी सुमारे 25 कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच हावडा आणि उत्तर 24 परगणा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारने 41 ठिकाणे ही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. हा झोन झोपडपट्ट्यांपासून फ्लॅट्स आणि उच्च श्रेणीतील गृहसंकुलांपर्यंतचा आहे. बहुतेक प्रकरणे उच्च व मध्यमवर्गीय भागात आढळून आली आहेत.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरला असून राज्यात कोरोनाचे नवे 9,073 रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 3,768 संक्रमित रुग्ण बरे झाले असून 16 जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 25,475 आहे. त्याच वेळी कोलकातामध्ये दुकानदारांना मास्कशिवाय दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वस्तू देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस विभाग आणि महापालिकेशी संबंधित कर्मचारी बाजारपेठेत जाऊन नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. याच वेळी, माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेले बाबुल सुप्रियो तिसऱ्यांदा या संसर्गाच्या विळख्यात आले आहेत.