विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत नसल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय काळजीत पडले आहे. देशाच्या इतर भागात ज्या वेगाने कोरोनाचा प्रसार झाला, त्याच वेगाने तो कमीसुद्धा झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून आठ ते पंधरा हजारांपर्यंत दररोज रुग्ण आढळत आहेत. याचा शोध घेण्यासाठी आरोग्य मंत्रालय या दोन्ही राज्यांमध्ये वैज्ञानिकांचे पथक पाठविण्याचा विचार करत आहे.
५२ टक्क्क्यांहून अधिक रुग्ण
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि केरळमध्ये दररोज ५२ टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे निम्मे मृत्यू एकट्या महाराष्ट्रात होत आहेत. संपूर्ण देशात रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशाच्या ५६ जिल्ह्यामध्ये दहा टक्क्यांहून अधिक संसर्गाचा दर आहे. यामध्ये केरळमधील आठ आणि महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
कारणांचा शोध
दोन्ही राज्यांमध्ये रुग्णसंख्या का कमी होत नाहीये, याचा शोध घेतला जात आहे. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचे पथक दोन्ही राज्यांमध्ये पाठविले जाणार आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हाजरी ग्रुप ऑन इम्युनाइजेशनचे (एनटागी) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी काही दिवसांपूर्वी केरळमध्ये रुग्णसंख्या वाढीच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.
८० टक्के लोकसंख्येला धोका
केरळमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणामध्ये अजूनही २० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी आढळल्या असल्याचे केरळच्या अधिकार्यांनी सांगितले. याचा अर्थ ८० टक्के लोकसंख्येला संर्गाचा धोका कायम आहे. केरळमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन होत असल्याने तसेच जागरुकता अधिक असल्याने बहुतांश लोक कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करू शकले आहेत. तेच लोक आता हळूहळू बाधित होत असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात ६१ लाखांहून अधिक रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचे नियम पाळले जात असल्याचे कारण दिले जाऊ शकत नाही. पहिल्या लाटेपासून आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे ६१ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दुसर्या क्रमांकावर केरळ असून, तिथे ३० लाखांवर रुग्ण आढळले आहेत. या राज्यांहून अधिक लोकसंख्या असूनही इतर राज्यांमध्ये रुग्णसंख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.