लंडन – जगभरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच पुन्हा एकदा युरोपसह काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. इतकेच नव्हे तर मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही देखील कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याच्या आतापर्यंत अत्यंत दुर्मिळ घटना घडलेले असून कोरोनाची लस केवळ माणसासाठी तयार झाली प्राण्यासाठी मात्र अद्याप लस तयार झालेली नाही.
ब्रिटनमध्ये एका पाळीव कुत्र्यात कोरोना विषाणू आढळून आला आहे. यूकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. यापूर्वी, जगातील विविध देशांमध्ये इतर प्राण्यांमध्येही कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दि. ३ नोव्हेंबर रोजी वेब्रिज येथील प्राणी आणि वनस्पती आरोग्य एजन्सीच्या प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यांनंतर या संसर्गाची माहिती झाली.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सर्व पुराव्यांवर विश्वास ठेवला तर कुत्र्याला कोरोना होण्यापूर्वी त्याच्या मालकालाही कोरोना झाला होता. त्यांच्या विधानानुसार, प्राण्याला त्याच्या मालकाकडून किंवा इतर कोणत्याही पाळीव प्राण्याकडून कोरोना झाल्याचा कोणताही पुरावा नाही. मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी क्रिस्टीन मिडलमिस यांनी निवेदनात म्हटले आहे की, कुत्र्यांना संसर्ग होणे अत्यंत दुर्मिळ आहे आणि ते सहसा फक्त सौम्य लक्षणे दर्शवतात आणि काही दिवसात बरे होतात.
पाळीव प्राणी थेट मानवांमध्ये विषाणू प्रसारित करतात याचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही. आणखी एक वैद्यकीय अधिकारी, कॅथरीन रसेल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय नियमानुसार या प्रकरणाची नोंद जागतिक प्राणी आरोग्य संघटनेला करण्यात आली आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील इतर देशांमध्ये पाळीव प्राण्यांमध्ये फारच कमी प्रकरणांची नोंद झाली आहे. कुत्रे माणसांच्या आसपास राहतात. त्यामुळे कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचे स्त्रोत देखील बनू शकतात, त्यामुळे कुत्र्यांशी संपर्क धोकादायक होईल. आत्तापर्यंत ही लस फक्त मानवांसाठीच बनवण्यात आली आहे, जगात प्राण्यांसाठी कोणतीही लस नाही.