पॅरिस – युरोपमधील अनेक देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढ दिसून आली आहे. सुमारे दिड ते दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. अनेक देशात कोरोनाची लाट कमी होत असतानाच पुन्हा एकदा त्याचा धोका वाढला आहे. विशेषतः युरोपियन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. केवळ संसर्गच नव्हे तर मृत्यू पावलेल्या रूग्णांची प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. विशेषतः फ्रान्स हा पाचव्या लाटेतून जात आहे.
फ्रान्समध्ये संक्रमित लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या बाबत आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फ्रान्समधील महामारीची पाचवी लाट पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते. कारण फ्रान्समध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या देशाचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
पंतप्रधानही आयसोलेशनमध्ये
पंतप्रधानांनी स्वत:ला विलगिकरणात ठेवले असून ते बंद खोलीतून आपले काम सुरू ठेवणार आहेत. यापूर्वी पंतप्रधानांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. पंतप्रधान बेल्जियमच्या दौऱ्यावरून नुकतेच परतले आहेत. तर दुसरीकडे खबरदारी म्हणून बेल्जियमचे पंतप्रधानही आयसोलेशनमध्ये गेले आहेत.
अवघ्या २४ तासांत वाढ
सध्या संपुर्ण फ्रान्स देशात कोरोना संसर्गामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच एका दिवसात सक्रिय प्रकरणांमध्ये एवढी वाढ झाल्याने नागरिकांच्याच्या मनात भीती निर्माण होत आहे. देशाच्या आरोग्य अधिकार्यांनी सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सांगितले की, अवघ्या २४ तासांत आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोना बाधितांची संख्या ६७ वरून १४०९ झाली आहे. साधारणतः ही वाढ दि. ३० सप्टेंबरनंतर दिसून आली.
दंगलीनंतर शाळा बंद
ग्वाडेलूपच्या फ्रेंच कॅरिबियन बेटावर लशीकरण आणि कोवीड-१९ प्रोटोकॉलचे पालन करण्यावरून झालेल्या दंगलीनंतर सोमवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या. फ्रान्स सरकारने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पोलीस दलाला सूचना दिल्या. फ्रान्सच्या आरोग्य कर्मचार्यांसाठी अनिवार्य केलेले कोविड लसीकरण आणि रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आरोग्य पास यामुळे संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरले होते. या दंगलीत सहभागी असलेल्या सुमारे ३८ जणांना अटक करण्यात आली आहे.
आफ्रिकेतही केसेस वाढल्या
आफ्रिकेत कोविड-१९ चे एकूण रुग्ण सुमारे ८६ लाख आहेत. आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (आफ्रिका सीडीसी) ने सांगितले की, येथे आतापर्यंत एकूण २ लाख संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, ट्युनिशिया आणि इथिओपियामध्ये संसर्गाची प्रकरणे जास्त आहेत.
सर्वात वाईट स्थिती अमेरिकेत
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून सर्वात वाईट स्थिती अमेरिकेत असून तेथे एकूण सुमारे ४ कोटी ७७ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ७ लाख ७१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे २०१९ च्या अखेरीस चीनमधून उद्भवलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात सुमारे २५ कोटी ७५ लाख नागरिकांना संसर्ग झाला असून सुमारे ५१ लाख ५० हजार बाधितांचा मृत्यू झाला आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी जगभरात लशीकरण सुरू असले तरी आतापर्यंत एकूण सुमारे ७४० कोटी लशीकरण करण्यात आले आहे.