विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आपल्या देशात सोशल मीडियावर अनेक समस्या आणि त्याच्या उपायाबाबतच्या पोस्टचा रतीब घातला जातो. त्या पोस्ट किती खऱ्या, किती खोट्या याची पडताळणी कोणीही करत नाही. त्यामुळे त्या सहज पुढे ढकलल्या जातात. ५ -जी तंत्रज्ञानाच्या चाचणीमुळे कोरोनाचा वेगाने फैलाव होतोय असे संदेश सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. ५-जीच्या टॉवरमधून निघणाऱ्या घातक लहरींमुळे हवा प्रदूषित होत असून, लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
या लहरींमुळे घरात प्रत्येक ठिकाणी वीजेचा धक्का लागत असल्याचा दावाही या व्हायरल पोस्टमध्ये केला जात आहे. या टॉवरच्या चाचणीवर बंदी लावल्यास सर्व काही सुरळीत होईल असा सल्लाही देण्यात आला आहे.
कोरोनाच्या प्रसाराशी संबंधित तथ्य आणि भ्रम याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब फेटाळून लावण्यात आली आहे. २६ मार्चला प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ५-जी मोबाईल नेटवर्कमुळे कोरोना फैलावत नाही. त्याशिवाय मोबाईल नेटवर्क आणि रेडिओ लहरींसोबत कोरोना विषाणू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. ५ जी नेटवर्क नसलेल्या देशांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.