विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांना गंभीररित्या अधिक संसर्गग्रस्त करू शकते, या दाव्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत, असे प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिक द लँसेटने एका अहवालात म्हटले आहे. भारतातील बालरोग कोविड-१९ या विषयाच्या अभ्यासासाठी देशातील प्रमुख बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करून लँसेट कोविड-१९ कमिशन इंडिया टास्क फोर्सने हा अहवाल तयार केला आहे.
लक्षणे नाहीत
जगभरातील इतर देशांमध्ये जी लक्षणे आढळली, त्याचप्रकारचे लक्षणे भारतातील संक्रमित लहान मुलांमध्ये आढळले आहेत. कोरोनाबाधित बहुतांश मुलांमध्ये या आजाराचे कोणतेच लक्षणे दिसत नाहीत. काही मुलांमध्ये संसर्गाचे खूपच कमी लक्षणे दिसली आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
ही आढळली लक्षणे
कोरोनाबाधित झाल्यानंतर बहुतांश मुलांमध्ये ताप आणि श्वास घेण्याचा त्रास अशी लक्षणे पाहायला मिळाली आहेत. वस्कांच्या तुलनेत मुलांना जुलाब, उलटी आणि पोटदुखीसारखे लक्षणेही दिसली. वय वाढल्याने आजाराची लक्षणे दिसण्याची शक्यता वाढत जाते.
आकडेवारी नाही
देशात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेदरम्यान किती मुले बाधित होऊन रुग्णालयात दाखल झाली, यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर आकडवारी तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआर भागातील १० रुग्णालयांमध्ये दाखल दहा वर्षांच्या खालील २६०० मुलांची वैद्यकीय आकडेवारी एकत्रित करून व त्याचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.