नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोच आता आपला देश पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडाशी असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एकीकडे मात्र दुसरी लाट ओसरत असल्याने देशभरातील १३ राज्यांमधील अनेक ठिकाणी शाळा उघडल्या असून नियमांमध्ये शिथिलता दिल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.
वैद्यकिय तज्ज्ञांच्या मते, या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू होईल आणि ऑक्टोबरमध्ये तो शिगेला पोहोचू शकतो. मात्र, या दरम्यान १३ राज्यांनी शाळा उघडल्या आहेत. यातील तीन राज्यांनी आता सोमवारपासून ऑफलाईन वर्ग सुरू केले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू झाल्यापासून ६१३ मुले संक्रमित आढळली आहेत.
महाराष्ट्र
दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात यंदा १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीसाठी शाळा उघडल्या असून तेथे आतापर्यंत संक्रमणाची कोणतीही नवीन प्रकरणे आढळून आली नाहीत. मात्र आता सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक मुले संक्रमित आढळली आहेत. यानंतरही राज्यातील शाळा बंद झाल्या नाही.
हरियाणा
राज्यात फतेहाबादमधील दोन शासकीय शाळांमधील सहा मुलांना संसर्ग झाल्याची माहिती मिळाली. तर आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मुलांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्यात नववी ते बारावीचे वर्ग १६ जुलैपासून आणि २३ जुलैपासून सहावी ते आठवीचे वर्ग उघडण्यात आले आहेत.
गुजरात
इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २५ जुलैपासून अर्ध्या क्षमतेसह सुरू आहेत. तर १५ जुलै रोजी महाविद्यालये उघडण्यात आली. काही ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.
ओडिशा
कंटेनमेंट झोनबाहेरील शाळा २५ जुलैपासून असून केवळ १० वी आणि १२ वी साठी या शाळा उघडण्यात आल्या आहेत.
पंजाब
राज्यात इयत्ता १०, ११ आणि १२ साठी शाळा २५ जुलैपासून उघडल्या असून आता सोमवारपासून पूर्व प्राथमिक ते नववीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहोत.
बिहार
१२ जुलैपासून येथे अकरावी आणि बारावीच्या वर्गांपासून महाविद्यालये आणि विद्यापीठेही उघडण्यात आली आहेत.
मध्य प्रदेश
दहावी आणि बारावीसाठी राज्यातील सरकारी शाळा उघडल्या. मात्र, खासगी शाळा ५ ऑगस्टपर्यंत केवळ ऑफलाईन वर्ग चालवतील.
छत्तीसगड
इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग २ ऑगस्टपासून सुरू झाले.
राजस्थान
२ ऑगस्टपासून शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उघडण्यात आली.
आंध्र प्रदेश
१६ ऑगस्टपासून येथे प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या शाळा अर्ध्या क्षमतेसह पुन्हा सुरू होतील.
गोवा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की १० वी आणि १२ वीचे वर्ग १५ ऑगस्टपासून सुरू होऊ शकतात.
जम्मू -काश्मीर
३१ जुलैनंतर या प्रदेशात मोठ्या वर्गांच्या शैक्षणिक आणि कौशल्य प्रशिक्षण संस्था उघडल्या आहेत.
पुडुचेरी
१६ जुलैपासून इयत्ता नववी ते बारावीसाठी येथे शाळा उघडण्यात येणार होत्या, परंतु या केंद्रशासित प्रदेशात १६ मुलांना संसर्ग झाल्यामुळे सरकारने निर्णय पुढे ढकलला.
दरम्यान, आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलराम भार्गव यांनी शाळा उघडण्याच्या राज्यांच्या निर्णयाचे समर्थन केले असून ते म्हणाले की, मोठ्या वर्गांऐवजी प्राथमिक वर्गांसाठी शाळा उघडणे चांगले होईल, कारण मुलांचे शरीर प्रौढांपेक्षा कोरोना संसर्गाशी अधिक चांगले लढू शकते. तसेच देशातील चौथ्या सेरो सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मोठ्या संख्येने मुलांमध्ये अँटिबॉडीज् तयार केली गेली आहेत.