मुंबई – कोरोना काळात सर्वाधिक दुर्लक्ष झालेला वर्ग म्हणजे गर्भवती आणि बाळांतीण महिला. त्यांच्या प्रकृतीकडेही कुणी लक्ष दिले नाही आणि प्रसूती होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर कोरोना झाल्यास काय करावे, याचाही विचार कुणी केला नाही. अश्यात अनके संभ्रम तयार झाले. त्यातून आणखी एक विषय सध्या चर्चेला येतोय. तो म्हणजे कोरोनाग्रस्त महिला आपल्या नवजात बाळाला अंगावरचे दूध पाजू शकते का?
वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाग्रस्त महिला आपल्या बाळाला अंगावरचे दूध पाजू शकते, असे स्पष्ट केले आहे. मात्र इतरवेळी आईने बाळाला आपल्यापासून ६ फूट अंतरावर लांब ठेवावे, असेही सूचविले आहे. गर्भात कोरोनाचे संक्रमण होते का, याबाबत कुठलेही पुरावे अद्याप आढळलेले नाहीत. पण तरीही गर्भवती महिलांनी सुद्धा कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच लस घेण्याच्या बाबतीत आहे. गर्भवती किंवा बाळांतीण महिला लस घेऊ शकते, कारण त्याचा कुठलाही दुष्परिणाम प्रजनन क्षमता किंवा प्रजनन अवयवांवर होत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉक्टर म्हणतात की कोरोनाग्रस्त आईने आपल्या बाळाला स्तनपान सुरू ठेवायला हवे, मात्र स्तनपान करत नसेल तेव्हा बाळाला लांब ठेवायला पाहिजे. घरात कुणी कोरोनाग्रस्त नसेल तर त्यांच्याकडे बाळाची जबाबदारी सोपवायला हवी. आईने बाळाला दूध पाजण्यापूर्वी स्वच्छता बाळगायला हवी. आपले हात स्वच्छ धुवून घेणे आणि मास्क लावणे या बाबी तर अनिवार्यच आहेत, असेही डॉक्टर म्हणतात.
गर्भावरील संक्रमणाबाबत…
गर्भाशयात तयार होणारा प्लॅसेंटा एका प्रोटेक्टिव्ह बॅरिअरच्या स्वरुपात काम करतो. या प्लॅसेंटामध्ये गर्भ वाढत असतो. अर्थात काही नवजात बाळांमध्येही कोरोनाचे संक्रमण आढळले आहे, मात्र त्यांना गर्भातून लागण झाली याचे कुठलेच पुरावे नाहीत, असे डॉक्टर म्हणतात.