विशेष प्रतिनिधी, मुंबई
आपल्याकडे एक म्हण आहे की की, ‘ गाव करील ते राव काय करील ‘ परंतु या उलट एखाद्या रावाने म्हणजेच गावाचा पुढारी किंवा राजकीय नेता असो की, गावातील प्रमुख व्यक्ती म्हणजे सरपंच असो, यांनी ठरवले तर गावात संपूर्ण कायापालट होऊ शकतो. मग ते कोणतीही समस्या किंवा विकासाचे काम असो. परंतु त्यासाठी गावाची साथ म्हणजे ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असतेच. हे सांगण्याचे कारण म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच एका गावाच्या तरूण सरपंचाचे भरभरून कौतुक केले आहे.
भारतीय शासन व्यवस्थेच्या सगळ्यात तळाचा मुख्य घटक म्हणजे सरपंच होय. गावचा प्रमुख हा सरपंच असल्याने त्याला राज्यघटनेनेच अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे गावाचा प्रमुख असलेल्या या सरपंचाला प्रतिकुल व्यवस्थेत बदल करत विकास कामात महत्त्वाचे स्थान असल्याचे मानले जाते. त्यामुळे सहाजिकच एखाद्या गावाचा विकास झाला तर अन्य गांवाचा मग, पर्यायाने तालुका, जिल्हा, राज्य आणि नंतर पर्यायाने देशाचा विकास होतो, असे म्हटले. त्यामुळे कोणतीही चांगल्या कामाची सुरुवात ही गावापासूनच व्हायला हवी, सध्याच्या कोरोना काळात शहरात संसर्गाची साथ कमी होत असताना काही गावांमध्ये म्हणजेच ग्रामीण भागात कोरोनाची साथ अद्यापही कायम आहे, किंबहुना शहरांपेक्षा येथील प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.
उद्यापासून म्हणजे दि. १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊन शिथिल करावा की नाही, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधतांना कोरोनाचे संकट सर्वप्रथम गावागावात दूर व्हावे असे म्हटले आहे. यासाठी संपूर्ण गाव कोरोना मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले असून याची जबाबदारी सरपंचांवर सोपविले आहे. सरपंच यासाठी त्यांनी तीन गावांची आणि तेथील सरपंचाच्या कार्याची उदाहरणे दिली आहेत.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकानं ठरवलं मी माझे गाव कोरोनामुक्त करायचं तर नक्कीच करू शकतो. सगळ्यांनी ठरवले माझे घर कोरोनामुक्त, वस्ती कोरोनामुक्त, गाव कोरोनामुक्त, तालुका कोरोनामुक्त सगळे राज्य कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. हिवरेबाजारचे पोपटराव पवार, घाटणे गावचा सरपंच ऋतुराज देशमुख, कोमल करपे यांनी त्यांची गावं कोरोनामुक्त केली. या तरूणाच्या कामाचे कौतुक आहे. मी लवकरच तिघांशी बोलणार आहे.आपल्याला कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राबवायची आहे. गाव कोरोनामुक्त झाल्यावर राज्य कोरोनामुक्त होईल, महाराष्ट्राचा आदर्श देशाने घेतला तर देश कोरोनामुक्त होईल असा देखील विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
देशमुखांनी असं करुन दाखवलं
मुख्यमंत्री ठाकरे यांनी यांनी कौतुकाने उल्लेख केलेले ऋतुराज देशमुख हे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील घाटणे गावाचे सरपंच आहेत. कोरोनामुक्त करण्यात गावचे हे सरपंच यशस्वी ठरले आहेत. गावचा सर्वात युवा सरपंच म्हणून निवडून आलेले ऋतुराज देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. मात्र कार्यकर्ता म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ऋतुराजला नेहमीच मिळाला. सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम हाती घेतली. ऋतुराजच्या या मोहिमेला ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद लाभला आणि गाव कोरोनामुक्त करण्यात यश आले.
पंचसूत्रीचा वापर
घाटणे गावात कोरोनाचे दोन मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर या गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराज यांनी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीचा वापर केला. तसेच जे ग्रामस्थ शहरात जातात किंवा जनसंपर्क अधिक असलेले व्यवसाय करतात अशा ग्रामस्थांसाठी आवश्यकतेनुसार रॅपिड अॅन्टिजेन टेस्टिंग सुरू करण्यात आले. तसेच गावातील ग्रामस्थांचे लसीकरण करून घेणे, आशा वर्कर्सच्या मदतीने वेळोवेळी गावकऱ्यांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासून घेणे, गावातील प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचा समावेश असेलेले ‘कोरोना सेफ्टी कीट’ देणे अशा विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्यामुळे ऋतुराज देशमूख यांच्या प्रयत्नाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे गाव कोरोना मुक्त झाले.