मुंबई – गेल्या दीड-दोन वर्षांपासून केवळ राज्य किंवा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून दुसरी लाट ओसरत नाही तोच आता तिसऱ्या लाटेची भीती सर्वांनाच वाटत आहे. यामुळे महाराष्ट्रात शासनस्तरावर कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय अद्यापही कायम आहे. काही जिल्ह्यांमध्ये नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली असली तरीही कोरोनाचे संकट कायम आहे. त्यातच दिलासादायक बातमी म्हणजे भंडारा जिल्हा राज्यातील पहिला पूर्ण मुक्त जिल्हा ठरला आहे.
भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, रुग्ण शोध, चाचणी आणि उपचार या धोरणामुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.
भंडाऱ्यात गेल्या वर्षी २७ एप्रिल रोजी गरदा बुद्रुक या गावामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, तर शुक्रवार, दि. ६ जुलै रोजी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी ५७८ जणांचे सँपल तपासण्यात आले. त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला होता. तर यावर्षी १ मे रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ३५ झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात ११३३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर १.८९ टक्के असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यात आतापर्यंत ९.५ लाख लोकसंख्येच्या ४० टक्के लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर १५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.