नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांच्यावर कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. देशात कोरोनाची चौथी लाट येऊन पुन्हा हाहाकार माजू नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून शाळकरी विद्यार्थ्यांना लस देण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्य सरकारांनी जिनोम सिक्वेन्सिंग करण्यावरही भर द्यावा. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत, कोरोना अद्याप संपला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि घटत्या चाचण्यांवर आरोग्यमंत्री मंडाविया यांनी काळजी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्ण वाढल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वेळोवेळी चाचण्या केल्यास कोरोनाच्या सामुदायिक प्रसाराला रोखण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात मंडाविया म्हणाले, की राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना चाचण्यांवर लक्ष केंद्रित करावे, तसेच नव्या म्युटेंटचा शोध घेण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगला प्रोत्साहन द्यावे. टेस्ट, ट्रॅकिंग, ट्रिट, वॅक्सिनेशन आणि जागरूकता या पंचसूत्रीचा अवलंब करावा.
मंडविया म्हणाले, की राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः लसीकरणावर लक्ष केंद्रित करावे आणि एका महिन्यापर्यंत विशेष शिबिरे लावून लसीकरण करवून घ्यावे. आता आपल्याला वेगाने प्रयत्न वाढविण्याची गरज आहे. शाळकरी मुलांसाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे १२ ते १७ वर्षांच्या मुलांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.