विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनामुळे जगाची वाताहत झाली. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लोकांचे व्यवसाय बुडाले. घरं उध्वस्त झाली, कुटुंब उध्वस्त झाले. पश्चिमेतील प्रगत राष्ट्र असो, सोमालिया असो वा प्रगतीशील भारत असो प्रत्येक देशाचे हाल झाले. आणखी किमान दहा वर्षे भरून निघणार नाही एवढी हानी झालेली आहे. पण या संपूर्ण काळात म्हणजेच गेल्या वर्षभरात काही कंपन्यांनी अरबो–खरबो रुपये कमावले आहेत. त्यांच्या कमाईकडे बघितले तर कोरोनामुळे व्यवसाय बुडाले यावर विश्वासच बसणार नाही.
या सर्वांत आघाडीवर आहे अॅप्पल, फेसबुक, ट्वीटर, गुगल आणि अॅमेझॉन. या पाच कंपन्यांनी आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्डस मोडीत काढले आहेत. याशिवाय मायक्रोसॉफ्ट आणि नेटफ्लिक्स या कंपन्यांची कमाई देखील डोळे दीपवून टाकणारी आहे. अर्थात सध्याचा काळ तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांचा आहे.
लॉकडाऊनमुळे आनलाईन साहित्य विकणाऱ्या अॅमेझॉन कंपनीची तर चांदीच आहे. अमेरिकेत तर या कंपनीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील बहुतांश कंपन्यांनी मंदीच्या नावावर कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आणि दुसरीकडे जोरदार कमाई देखील केली.
भारतात टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या व्यतिरिक्त रिटेल, कंझ्युमर, टेलिकॉम, फार्मास्युटिकल, एफएमसीजी आदी कंपन्यांनी मोठा नफा कमावला. या सर्व कंपन्यांना लॉकडाऊनचा भरपूर फायदा झाला. लोक घरात बंद होते आणि त्यांचा दिवस टीव्ही किंवा मोबाईलवरच जायचा. त्यामुळे जिओ, एअरटेलसारख्या टेलिकॉम कंपन्यांनीदेखील भरपूर कमाई करून घेतली.
केवळ शहरांमध्येच नव्हे तर गावांमध्येही असेच चित्र होते. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांनी अनेक प्रकारच्या स्कीम्स आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आजही ते प्रयत्न थांबलेले नाहीत. यातच अनेक नवे ओटीटी प्लॅटफॉर्मसुद्धा जन्माला आले.