विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
छत्तीसगड येथील बस्तर संभागच्या जंगलांमध्ये आश्रयाला असलेल्या नक्षलवाद्यांना सध्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने हैराण करून सोडले आहे. नक्षलवादी संघटनांमध्ये वेगाने पसरत असलेल्या या संक्रमणामुळे अक्षरशः गोंधळाचे वातावरण आहे. खालच्या कॅडरचे पंधराहून अधिक नक्षलवादी गावांच्या दिशेने परतले आहेत. नक्षलवाद्यांसोबत बीजापूरमध्ये झालेल्या चकमकीनंतर पोलिसांना हाती एक पत्र लागले. त्यातून ही माहिती मिळाली आहे.
नक्षलवादी संघटनांमध्ये विद्रोह करून घरी परतलेल्या सर्वांची नावे आणि पत्ता पोलिसांना या पत्रातून हाती लागले आहे. आता त्यांच्या आत्मसमर्पणासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, कोरोनावरून नक्षलवादी संघटनांमध्येच फुट पडल्याची माहिती पुढे येत आहे.
खालच्या कॅडरच्या नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे की सध्या युद्धविराम घोषित करून कोरोनाशी लढण्याचा उपाय शोधायला हवा. तर झोनल कमिटीचे नक्षल नेते कोरोनामुळे मरत असल्या साथीदारांचा विचार सोडून सैन्यावर हल्ला चढविण्याची रणनिती आखत आहेत.
दंतेवाड्याचे एसीपी डॉ. अभिषेक पल्लव यांनी सांगितले की नक्षल नेते दररोज आपल्या संघटनेची बैठक घेत आहेत. खालच्या कॅडरवर आजारी असतानाही बैठकीत येण्याचा दबाव टाकला जात आहे. त्यांना मास्क किंवा सॅनिटायझर यापैकी काहीच दिले गेलेले नाही. नेत्यांच्या या भूमिकेमुळे हैराण झालेले नक्षलवादी पोलिसांना शरण येण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण पोलिसांना शरण येऊन किमान जीव तरी वाचेल.
नक्षलवादी जोडपे शरण
कोरोनाचे संक्रमण झालेले नक्षलवादी जोडपे पोलिसांना शरण आले आहे. कोरोना झाल्यावर दोघांनीही आत्मसमर्पण करण्याची इच्छा असल्याचे पोलिसांना कळविले होते. त्यानंतर तातडीने त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. आत्मसमर्पणाची औपचारिकता उपचारानंतर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.