नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीनंतर जगभरात हळूळहळू सर्व स्थिती पूर्वपदावर येत आहे. नोकरदार वर्गाने कार्यालयांमध्ये परतण्यास सुरुवात केली आहे, व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ घरी बसलेले वैमानिकांसमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे, कोरोना लॉकडाऊन व विमानसेवा बंद काळात वैमानिकांचा सरावच झालेला नाही. त्यामुळे त्यांना विमान चालविण्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. वैमानिकांकडून उड्डाणात वारंवार चुका होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, विमान अपघाताची भीती वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अनेक वैमानिक स्वतः म्हणतात की, इतके दिवस घरी बसल्यानंतर त्यांना विमान उडवताना काही अडचणींना सामोरे जावे लागले. म्हणूनच अनेकांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. कुणाला विमान सुरू करण्यात अडचण आली, कुणाला लँडिंग करताना, कुणाला उड्डाण घेताना, काही जण दुसरे इंजिन सुरू करण्यासही विसरले, काहींना तातडीने स्टेशन टीमची मदत घ्यावी लागत आहे. या सर्व प्रकारात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा काही चुका अमेरिकेच्या एका नामांकित विमान कंपनीच्या वैमानिकांनी केल्या आहेत.
अमेरिकेतील मोठ्या विमान कंपन्यांनी उड्डाण करणाऱ्या वैमानिकांचे एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, अनेक वैमानिकांची स्थिती जवळपास सारखीच होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामागील कारण कोरोनामुळे विमान उड्डाण थांबवणे किंवा सराव गमावणे होते. अशा डझनहून अधिक चुका झाल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.
उड्डाणांवरील बंदीमुळे जगभरात सुमारे १ लाख वैमानिक काम करू शकले नाहीत. आता सुमारे १८ महिन्यांनंतर ते पुन्हा एकदा कामावर परतले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे पुन्हा प्रशिक्षण घेतले गेले. परंतु त्यांनी प्रशिक्षण सत्रात देखील अनेक चुका केल्या आहेत. आता उड्डाणे देखील सुरू केली जात आहेत. या दरम्यान अमेरिकेत अनेक वैमानिकांच्या चुका समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.