नाशिक – प्रसिद्ध कवियत्री प्रा. ज्योती शिरीष संकपाळ (वय ६२ वर्ष) आणि त्यांची ज्येष्ठ मुलगी शिक्षिका . काश्मिरा सागर घोडके (वय ४१) यांचे कोरोनामुळे निधन झाले. अवघ्या एकच दिवसात माय-लेकीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कवियत्री प्रा ज्योती संकपाळ या माजी सैनिक व मंत्रालयातील अधिकारी स्व. शिरीष संकपाळ यांच्या पत्नी होत्या. त्यांनी ३० वर्ष जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आदर्श शिक्षिका म्हणून मोलाचे कार्य केले. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांना शासनाने आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या विविध सामाजिक कारकिर्दीला व कवितांना अनेक सामजिक पुरस्कार मिळाले होते.
नुकतेच काही महिन्यांपूर्वी मुंबई साहित्य परिषदेच्या वतीने त्यांच्या कवितांना गौरविण्यात आले होते. अशा सुपरीचित कवीयत्रीचे १८ एप्रिल रोजी निधन झाले. तत्पूर्वी त्यांची कन्या व केंब्रिज इंग्रजी माध्यमातील शिक्षिका सौ. काश्मिरा घोडके यांचेही १७ एप्रिल रोजी एका रात्रीच्या फरकाने निधन झाले. संकपाळ यांच्या पश्चात कन्या शिक्षिका मोनिका परमार, अभिनेत्री व निवेदिका नयन जयप्रकाश, जावई व नातवंडे असा परिवार आहे.