विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असली तरी मृत्यूदर चिंताजनक स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजार मृत्यू प्रतिदिवसावर स्थिर झालेला आकडा ९ जूनला अचानक ६ हजारांच्यावर पोहोचला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. बिहारमध्ये कोरोना मृत्यूदर जवळपास ७३ टक्क्यावर गेल्याने हा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, ७ जून २०२१ पर्यंत बिहारमध्ये कोरोनामुळे ५,४२४ लोकांचा मृत्यू झाला होता. (मार्च २०२० पासून मार्च २०२१ पर्यंतचा १,६०० मृत्यूंचा समावेश) परंतु बिहारमध्ये आतापर्यंत ५,४२४ मृत्यू नव्हे, तर ९,३७५ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय आणि जिल्हास्तरावरील पडताळणीमध्ये उघड झाली आहे. म्हणजेच बिहार सरकारकडे ३,९४१ लोकांचा आकडा नव्हता. यासंदर्भात पाटणा उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर दोन समित्यांचे गठण करण्यात आले. त्या संमित्यांच्या अहवालात हा आकडा समोर आला आहे.
बिहार सरकार अनभिज्ञ
या प्रकरणी वाद वाढल्यानंतर बिहारच्या आरोग्यमंत्र्यांनी सारवासारव केली. गावे आणि ग्रामीण भागातील मृत्यूचा आकडा अपडेट होऊ शकला नाही, असा दावा त्यांनी केला. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की १८ मे रोजी मृतांची ओळख पटविण्यासाठी गठित दोन समित्यांनी ८ जूनला अपला अहवाल सुपूर्द केला. त्यानुसार, कोरोनामुळे चार हजार लोकांचे मृत्यू झाल्याचा दुजोरा अहवालात देण्यात आला. या आकड्यांची सरकारकडे नोंदच नव्हती.
मृतांच्या नातेवाईकांना मदत
सरकारकडून दुजोरा मिळालेल्या मृतांच्या नातेवाईकांना चार चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत ३,७३७ लोकांना पैशांचे वाटपही झाले आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे.
उत्तराखंडमध्येही निष्काळजीपणा
उत्तराखंडमध्येसुद्धा कोरोना मृतांचा आकड्यांच्या बाबतीत निष्काळजीपणा समोर आला आहे. एप्रिल-मे २०२१ मध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी नियंत्रण कक्षाला पूर्ण आकडा उपलब्ध करून दिला नाही. १७ मे ते १० जूनपर्यंत राज्यात ७९८ आधी उपलब्ध नसलेल्या मृतांच्या आकड्यांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ६,८७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयांमधील कर्मचार्यांची कमतरता आणि पोर्टलमधील किचकटपणामुळे आकड्यांची नोंद झालेली नाही, असा खुलासा करण्यात आला.
बिहारचे आकडे
– बिहारमध्ये दुसर्या लाटेमुळे गेल्या वर्षभराचे सर्व विक्रम मोडित निघाले आहेत. नव्या संक्रमित रुग्णांची संख्या एका दिवसात १५ हजारांच्यावर पोहोचली आहे.
– मार्च २०२० पासून मार्च २०२१ च्या दरम्यान राज्यात १६०० लोकांचा मृत्यू झालेला आहे.
– मार्च २०२१ ते आठ जूनच्या दरम्यान ७,७७५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. दुसर्या लाटेत राज्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत चाडेचार पट अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मृतांचा आकाडा प्रथमच सहा हजारांवर
बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यूंच्या दरात मोठी उसळी घेतल्याने देशात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा प्रथमच प्रतिदिन सहा हजारांवर गेला आहे. वल्डमीटरच्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात १८ मे रोजी कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ४,५३५ नोंदविले होते. त्यापूर्वी ४,३४० मृतांची नोंद झालेली आहे. ८ जूनला बिहारमध्ये मृतांचा आकडा समोर आल्यामुळे ९ जूनला अचनाक उसळी घेऊन ६,१३८ वर पोहोचला आहे.