नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार रूपये सानुग्रह सहाय्य देण्यासाठी शासनस्तरावर योजना राबविण्यात येत आहे. या आजारामुळे 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यु झाला असल्यास दिनांक 24 मार्च 2022 पासून पुढे 60 दिवसांच्या आत तर 20 मार्च 2022 पासून पुढे मृत्यु झाला असल्यास 90 दिवसांच्या आत निकटच्या नातेवाईकांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, महसूल व वन विभग 26 नोव्हेंबर 2021 अन्वये कोरोना आजाराने मृत्यु झालेल्या जवळच्या नातेवाईकांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी सानुग्रह सहाय्य देण्याची योजना 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हास्तरावर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने ज्या नातेवाईकांना आपले अर्ज वरील नमुद मुदतीत सादर करता आले नाहीत त्यांचे मुदती नंतरचे आलेले अर्ज स्वीकारण्यासाठी “गाऱ्हाणे निवारण समिती” स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत कोरोना आजाराने मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेकरीता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या विरूद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.