नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना मृतांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी हजारो जणांनी शहरात अर्ज केले. त्यातील काही अर्ज नाशिक महापालिकेने नाकारले आहेत. यासंदर्भात नाशिक मनपाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
नाशिक महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु.50,000/- (रु. पन्नास हजार) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्या बाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार ज्या व्यक्तिंचे निकटवर्तीय नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये मयत झाले असतील व त्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. प्रशासना तर्फे कोणत्याही कारणास्तव अर्ज नाकारण्यात आला असेल अशा सर्व नागरीकांनी व ज्या नातेवाईकांनी तक्रार निवारण समितीकडे ऑनलाईन पद्धतीने अपील केले आहे. त्यांना ऑनलाईन पोर्टल वरुन संदेश देण्यात आला आहे, तसेच वैद्यकिय विभाग नाशिक म.न.पा. यांचे मार्फत फोनद्वारे संदेश देण्यात आला आहे, त्यांनी दि. 31 मार्च पर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक येथे सुनावणी कामी उपस्थित रहावे. जर अर्जदार उपस्थीत राहू शकले नाहीत तर आपले याबाबत काहीएक म्हणणे नाही असे गृहित धरुन आपला अर्ज निकाली काढण्यात येईल.