विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे दुसर्यांना संसर्ग होण्याची शक्यताही राहत नाही. परंतु सतर्कता म्हणून संक्रमित मृतदेहाचा अंत्यसंस्कार ठरलेल्या प्रोटोकॉलप्रमाणेच करणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास २४ तासांनंतर त्याच्या नाक आणि तोंडात संसर्ग आढळत नाही, असे नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) फॉरेंसिक तज्ज्ञांना एका अभ्यासात आढळले आहे.
संशोधनादरम्यान एम्सच्या डॉक्टरांनी १०० मृतदेहांचे परीक्षण केले होते. या सर्वांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. मृत्यूनंतर चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
एम्सचे फॉरेंसिक विभागाचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुमार गुप्ता सांगतात, मृतदेहांद्वारे संसर्गाचा फैलाव होत असल्याच्या चर्चाबाबत तथ्य शोधण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी संशोधन करण्यात आले. रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर घसा आणि नाकातून स्वॅब घेण्यात आले. तेव्हा मृतदेहामध्ये विषाणू आढळला नाही.
परंतु, मृत्यूच्या काही तासांनंतर शरीरातून निघणार्या द्रव्याबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्याबाबत केंद्र सरकारने एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सल्ल्यांच्या आधारे दिशानिर्देश तयार केले आहेत. डॉ. सुधीर गुप्ता आणि एम्सच्या संशोधन परिषदेच्या पथकाने या दिशानिर्देशांना तयार केले आहेत.