मुंबई – कोरोनाच्या संकटकाळात खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना अक्षरशः लुटले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी त्याची कबुलीच आज विधिमंडळ अधिवेशनात दिली आहे. रुग्णालयांनी घेतलेले अतिरिक्त शुल्क रुग्णांना परत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कोरोना कालावधीत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका तसेच राज्यस्तरावरही तक्रार नोंदविण्याची संकेतस्थळाच्या माध्यमातून सोय करण्यात आली होती. या माध्यमातून नॉन एनपॅनेल्ड दवाखान्याच्या सुमारे 63 हजार 889 तक्रारींपैकी 56 हजार 994 इतक्या तक्रारी सोडविण्यात आल्या आणि 35 कोटी 18 लाख 39 हजार रुपये परत करण्यात आले. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत असलेल्या एनपॅनेल्ड दवाखान्यांच्या 2 हजार 81 तक्रारींपैकी 774 तक्रारी सोडविण्यात आल्या आणि 1 कोटी 20 लाख रुपये परत करण्यात आले, असेही श्री. टोपे यांनी सांगितले. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सदाशिव खोत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
त्या रक्तपेढ्यांवर कारवाई करणार
मुंबई – राज्यातील रक्त पेढ्यांमार्फत दैनंदिन उपलब्ध रक्त साठा हा सातत्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात येतो. थॅलेसेमिया, सिकलसेल रुग्णांना रक्त देतांना टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येते. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
श्री.टोपे म्हणाले, शासकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील रुग्णांना नि:शुल्क रक्त देण्यास सुरुवात केली आहे. जिथे रक्ताची आवश्यकता असेल तिथे रक्त पोहचविण्यासाठी इंटरलिंक्ड सुविधा उभारण्यात येत आहे. रक्तपेढ्यांच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी रक्तदान शिबीरे घेतली जात आहे. राज्यात रक्ताची आवश्यकता पडल्यास पुरेसा साठा उपलब्ध राहिल यासाठी काळजी घेतली जात आहे. असेही त्यांनी सांगितले. या विषयाच्या अनुषंगाने डॉ.रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.