विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विपरित परिणाम लघुउद्योग आणि स्टार्टअपवर होत आहे. एका स्थानिक सर्वेक्षणानुसार, महामारी आणि लॉकडाउनमुळे देशातील निम्म्याहून अधिक लघुउद्योग तसेच स्टार्टअप बंद होऊ शकतात. हे सर्वेक्षण देशातील १७१ जिल्ह्यातील ६००० हून अधिक स्टार्टअप आणि लघुउद्योजकांच्या चर्चेच्या आधारवर केले आहे.
सर्वेक्षणानुसार, देशात ५९ टक्के सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअप निधी नसल्यामुळे या वर्षीच्या अखेरपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. किंवा उद्योगांची विक्री होऊ शकते. आपला उद्योग येत्या सहा महिन्यात विक्री करण्याचा विचार असल्याचे ८ टक्के उद्योजकांनी म्हटले आहे. जवळपास २२ टक्के एमएसएमई आणि स्टार्टअप तीन महिन्यांपर्यंत सुरू ठेवण्यास सक्षम असतील.
सर्वेक्षणात सहभागी ३७ टक्के एमएसएमई आणि स्टार्टअपजवळ एक ते तीन महिन्यांपर्यंत उद्योग सुरू ठेवण्यासाठी पैसे शिल्लक आहेत. ४१ टक्के उद्योजकांकडे एक महिन्याहून कमी वेळेपर्यंत पैसे शिल्लक आहेत किंवा काहीच पैसे शिल्लक नाहीत. जुलैपर्यंत कर्मचार्यांचे वेतन आणि इतर लाभांमध्ये कपात करण्याचा विचार ४९ टक्के उद्योजक करत आहेत.
सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आले की, गेल्या वर्षी जेव्ही महामारीची सुरुवात झाली, तेव्हापासूनच या कंपन्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसत होते. मार्च ते सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाउन आणि यावर्षी पुन्हा लॉकडाउन लागल्यामुळे उद्योगांवर गंभीर परिणाम झाला आहे. विक्रीमध्ये घट झाल्यामुळे अनेक कंपन्यांकडे उद्योग चालविण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे एमएसएमई आणि स्टार्टअपला अनेक कठोर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कर्जाच्या हफ्त्यांमध्ये दिलासा द्यावा
भारतीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांच्या संघटनेने रिझर्व्ह बँकेला साकडे घातले आहे. महामारीतून बाहेर पडण्यासाठी हमीवाल्या कर्जांच्या हप्त्यांमध्ये दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने एमएमसएमईंना कर्जाचे पुनर्गठन आणि एनपीएच्या निकषांमधून सवलत द्यावी. सततच्या लॉकडाउमुळे हजारो एमएसएमई आणि लाखो कामगारांवर खूपच वाईट परिणाम झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.