विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
”कोविड संसर्गाच्या सुरूवातीच्या प्राथमिक टप्प्यात रुग्णांच्या सिटीस्कॅनचा काही उपयोग नाही. त्यामुळे रुग्ण गंभीर स्थिती असेल आणि निदानाकरिता आवश्यक गरज असेल तेव्हाच सिटीस्कॅन करावे. एका सिटीस्कॅनमध्ये ३०० एक्स रे इतके रेडिएशन होते. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. छातीच्या क्ष किरणानंतरच (एक्स रे) डॉक्टरांनी सिटीस्कॅनची गरज आहे की नाही याबद्दल योग्य विचार करून निर्णय घ्यावा,” असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, ज्या रुग्णांचे वारंवार सिटीस्कॅन करण्यात येत आहेत त्यांना सिटीस्कॅनमुळे कर्करोगाचा धोका आहे. रेडिएशनच्या डेटाचे विश्लेषण केल्यावर असे दिसून आले आहे की, लोक तीन-तीन दिवसांत सिटीस्कॅन करत आहेत. रुग्ण पॉझेटिव्ह असून सौम्य लक्षणे असतील तर तुम्हाला सिटीस्कॅन करण्याची आवश्यकता नाही. कारण सिटीस्कॅनमध्ये आलेल्या अहवालात असे काही रुग्णांच्या अंगावर पुरळ उठले असून त्यामुळे रुग्ण अस्वस्थ होतो.
डॉ. गुलेरिया यांच्या मते, जर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल पण श्वास घ्यायला त्रास होत नसेल, तर ऑक्सिजनची पातळी ठीक आहे, तसेच जास्त ताप येत नाही, तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. तसेच कोणत्याही पॉझिटिव्ह रूग्णाने जास्त औषधे घेऊ नये. या औषधांचा उलट परिणाम होतो आणि रुग्णाची तब्येत ढासळण्यास सुरवात होते.
लोकांची वारंवार रक्त तपासणी केली जाते, परंतु डॉक्टरांनी विचारल्याशिवाय हे सर्व स्वतःहून करू नका. यामुळे रुग्णाला अधिक तणाव निर्माण होतो. त्याचप्रमाणे घरी क्वॉरंटाईन (विलगीकरण) राहणाऱ्यां लोकांनी डॉक्टरांशी संपर्क साधत रहावा. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दी होणे, चक्कर येणे, छातीत दुखणे अशा परिस्थिती डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.