अकोला – जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांची सोय असणारे कोविड हेल्थ सेंटर सज्ज करण्यात आले आहे. पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज या कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या पाहता कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुरक व्यवस्था करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात आहे. त्याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे नियोजन असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर ऑक्सिजन सुविधेसह सुरु करण्यात येत आहे. सद्यस्थितीत येथे १०० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास ही खाटांची संख्या वाढविता येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. पालकमंत्री श्री.कडू यांनी आज याठिकाणी भेट दिली. या प्रसंगी कुलगुरु डॉ.विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, सदाशिव शेलार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
हे सेंटर येत्या सोमवार पासून कार्यान्वित होणार असून त्या दृष्टीने करण्यात आलेल्या सज्जतेचा पालकमंत्री श्री.कडू यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरचीही पाहणी
तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन सभागृहात सुरु केलेल्या कोविड सेंटरचीही पाहणी केली.
कन्टेनमेंट झोनची पाहणी
कोविड बाधित रुग्णांची संख्या अधिक असणाऱ्या भागास कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले जाते. अशा उमरी येथील भागात आज पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी एका पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या घराच्या बाहेरुन घरातील व्यक्तिंशी संवाद साधून चर्चा केली. त्यांना जाणवणाऱ्या अडचणी, उपचार सुविधांबाबत विचारपूस केली. तसेच ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशा कुटुंबांना अन्न धान्य मोफत व घरपोच पोहोचविण्याबाबत व्यवस्था प्रशासनाने करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यात तब्बल ३२० खाटांची सुविधा असलेले कोविड हेल्थ केअर सेंटर्स तसेच ऑक्सिजन सुविधा, आवश्यक औषधी व अन्य उपचार सुविधांसाठी पाच कोटी चार लक्ष २४ हजार रुपयांची तरतूद करुन प्रशासकीय मान्यताही प्रदान केली आहे.
पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या उपचार सुविधेत प्रशासनाने कोणतीही कमतरता ठेवू नये याबाबत निर्देशित केले असून त्यानुसार आवश्यक निधीची तरतूद करुन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.
त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दीक्षांत सभागृहात २०० खाटा या साठी एक कोटी ४० लक्ष ९६ हजार रुपये तर ग्रामिण रुग्णालय अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि बार्शी टाकळी येथे प्रत्येकी ३० खाटांचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे,. या शिवाय मुर्तिजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेल्या सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमला अतिरिक्त जोडणी बसविण्यात येणार आहे. या शिवाय या सर्व कोविड हेल्थ केअर सेंटर येथे ऑक्सिजन बेड सहित सर्व सुविधांची सज्जता करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी ६० लक्ष २८ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. असा एकूण पाच कोटी चार लक्ष २४ हजार रुपयांचा निधी कोविड उपचार सुविधेसाठी देण्यात आला आहे. यात ऑक्सिजन सुविधा, सिलिंडर भरणे इत्यादी सुविधांसह रेमडेसिवीर सहित अन्य औषधांच्या खरेदीचाही समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात चार ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी २० प्रमाणे एकूण ८० तर पातूर येथे ५०, पीकेव्ही येथील २०० बेड तर अकोला जिल्हा परिषदेने स्थापलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटर मधील ५० अशा तब्बल ३८० ने खाटांची उपलब्धता व उपचार सुविधा निर्माण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.