विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर, आता कोरोना संसर्ग कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यासह काही राज्यांत दैनंदिन कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होत आहे किंवा ते स्थिर आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, २१ एप्रिल रोजी नवीन रुग्णांच्या तुलनेत केवळ ५७ टक्के रुग्ण बरे झाले होते. परंतु आता २ मे रोजी बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढली असून ती नवीन दाखल झालेल्या रुग्णांपेक्षा ८२ टक्के आहे. तथापि, अद्यापही भारतात कोरोना लाट थांबविण्याची खात्री कोणीही बाळगू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने दक्षता घेणे फार महत्वाचे आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशात कोरोनांची संख्या झपाट्याने वाढत होती, २७ एप्रिल रोजी संक्रमित व्यक्तींची संख्याही ३४ हजारांच्या पुढे गेली होती. त्यानंतर मात्र रुग्ण वाढीची प्रक्रिया संपुष्टात आली आणि काही दिवसांनंतर २ मे रोजी ही संख्या ३३ हजारांवर आली. तसेच, दिल्लीत २५ एप्रिलला रूग्ण संख्या शिगेला पोहोचली. त्यानंतर नवीन रुग्णांत २ मे पर्यंत एक हजारांची घट नोंदविण्यात आली आहे.
छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही संक्रमणाचा समान कल दिसून येतो. मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा आणि गुजरातमध्ये नवीन प्रकरणांची वाढ थांबली आहे. तसेच अग्रवाल पुढे म्हणाले की, ही सुरुवातीची चिन्हे आहेत आणि जर संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारांनी अशीच पावले उचलली तर येत्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
काही राज्यांत संसर्ग होण्याच्या नवीन घटनांमध्ये वाढ होणे अद्याप चिंतेचे कारण आहे. विशेषत : बिहार, हरियाणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आणि केरळ यासारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालय या राज्यांच्या संपर्कात आहे.
देशात १ मे रोजी, कोरोनामुळे ३,५२३ रुग्णांचा मृत्यू झाला, २ मे रोजी ३,६८९ मृत्यू झाले, परंतु ३ मे रोजी ही संख्या ३,४१७ वर आली. साधारणपणे, नवीन रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर त्या आठवड्यापासून मृत्यूची संख्या कमी होऊ लागते. सर्व राज्यात विविध प्रकारे बचाव उपाययोजना केल्या जात राहिल्या तर संक्रमणावर नियंत्रण मिळू शकेल. परंतु काही राज्यांमधील वाढती प्रकरणे अद्याप चिंतेचे कारण आहेत. अशा परिस्थितीत दुर्लक्ष केल्यास परिस्थिती बिघडू शकते, असेही त्यांनी सांगितले