नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीच्या कवेत आलेले आहे. सध्या भारतातही महामारीची तिसरी लाट आलेली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेल्या या लाटेत दररोज ओमिक्रॉनचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. संपूर्ण जग एक नव्हे, तर दोन दोन महामारींशी लढा देत आहे, असे देशातील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉ. टी. जेकब जान यांनी म्हटले आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंट या दोन रूपांना त्यांनी दोन महामारी म्हटले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना जॉ. जेकब यांनी कोरोना महामारी कशी वाढणार आहे याबद्दल सांगितले. ते म्हणाले, की ओमिक्रॉन हा व्हेरिएंट चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या डी-६१४ जी अल्फा, गॅमा, डेल्टा, कप्पा, किंवा मू, था या विषाणूतून निघालेला नाही. मूळ विषाणूत झालेल्या अनेक बदलांतून या विषाणूचा जन्म झाला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)च्या सेंटर ऑफ अॅडव्हान्स रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक डॉ. जेकब म्हणाले, की ओमिक्रॉन हा व्हेरिएंट कोणत्यातरी अज्ञात वंशाचा आहे. परंतु वुहानमधील डी६१४जी व्हेरिएंटशी त्याचे कुठे ना कुठे तरी संबंध आहेच. जगभरात सार्स-सीओव्ही-२ वेगाने फैलावत असून, तो डी६१४जी या प्रोटिनमध्ये अॅमिनो अॅसिड म्युटेशनला तो संदर्भित करतो.
ते सांगतात, की कोरोनाचे इतर व्हेरिएंट नागरिकांच्या श्वसन यंत्रणेला प्रभावित करत होते. बहुतांश नागरिकांना न्यूमोनियाच्या तक्रारी वाढत होत्या. परंतु अनेक प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट घशापर्यंतच थांबतो आहे. ओमिक्रॉन हा कोरोना महामारीच्या आतापर्यंतच्या व्हेरिएंटपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे डेल्टा आणि त्याच्याशी संबंधित व्हेरिएंटमुळे एक वेगळी महामारी सुरू आहे. आणि ओमिक्रॉनमुळे दुसरी महामारी समांतररितीने सुरू आहे.
तिसरी लाट सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे का असे विचारले असता ते म्हणाले, काही ठिकाणी आता रुग्णसंख्या कमी होत आहे. महानगरांमध्ये सर्वात प्रथम नवे रुग्ण आढळले होते. तिथेच सर्वप्रथम ते कमीही होतील. जितक्या वेगाने रुग्ण वाढले होते, तितक्याच वेगाने ते कमी होतील. कोरोनाचे आगामी व्हेरिएंट संक्रामक आणि कमी घातक होणार का, यावर डॉ. जेकब म्हणाले, साधारणतः नवे आजार माणसाच्या शरीराशी अनुकूल असतात. या प्रक्रियेत ते एका मर्यादित वेळेच्या आत अधिक संक्रामक आणि कमी घातक होतात.