विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी आहे. देशात कोरोना महामारी वेगाने फैलावत असताना अँटीबॉडी तयार करणारे कॉकटेल औषध उपलब्ध झाले आहे. स्वित्झर्लंडची औषध निर्माता कंपनी रॉश आणि भारतातील सिप्ला कंपनीतर्फे अँटीबॉडी कॉकटेलला लाँच करण्यात आले आहे. अँटीबॉडी कॉकटेल (कासिरिविमॅब आणि इमडेविमॅब) या औषधाचा पहिला डोस बाजारात उपलब्ध झाला आहे. दुसरा डोस जूनपासून उपलब्ध होणार आहे.
दोन्ही कंपन्यांकडून एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले की, रुग्णांना देण्यात येणाऱ्या कॉकटेलच्या एका डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये ठरविण्यात आली आहे. सौम्य आणि अधिक लक्षणे असलेल्या रुग्णांसह अति जोखमेच्या रुग्णांवर या औषधाने उपचार होऊ शकणार आहेत. देशात कोविड रुग्णालयांमध्ये या औषधाचे वितरण सिप्ला कंपनी करणार आहे.
कॉकटेलचा संयुक्त डोस १२०० एमजीचा असेल. एका पॅकमध्ये दोन रुग्णांचा उपचार होऊ शकणार आहे. त्याची एकूण किंमत १,१९,५०० रुपये इतकी असेल. केंद्रीय औषधे मानके नियंत्रक संस्थेने (सीडीएससीओ) या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
मुलांसाठीही औषध
रॉश कंपनीचे संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी व्ही. सिंप्सन इमॅन्युअल सांगतात, अँटीबॉडीच्या कॉकटेल औषधामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारे दुसरे आर्थिक भार कमी करण्यास मदत होणार आहे. सिप्लाच्या विशेष कार्यकारी अधिकारी उमंग व्होरा सांगतात, देशभरात औषधाच्या पुरवठ्यासाठी मार्केटिंगची व्यवस्था भक्कम केली जात आहे. वयस्करांसह १२ वर्षांच्या वरील वयाच्या ४० किलोहून अधिक वजनाच्या बाधित मुलांच्या उपचारासाठी हे औषध वापरले जाऊ शकते.