अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध झाला असून कोविड १९ मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी १० हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या योजनेसाठी पात्र लाभार्थी यांनी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, संरक्षण अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अर्पित हाउस, श्री.संजय जव्हेरी यांची इमारत सर्जेपुरा, अहमदनगर यांच्याकडून अर्जाचा नमूना घेऊन आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावा.
अर्थसहाय्य मिळण्याकरीता मूळ अर्ज, बालकांचे शाळेचे बोनाफाईड, आई/वडील कोविड पॉझिटीव्ह असल्याबाबतचा पुराव्याची छायाप्रत आई/वडील मृत्यु दाखला छायाप्रत, बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीकृत बँकेत खाते असले बाबत पास बुक छायाप्रत, बालकाचे आधारकार्ड छायाप्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख (भ्रमणध्वनी – ९९२१११२९११) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.