नाशिक – सद्यस्थितीत कोविड-19 या रेागाचा वाढलेला संसर्ग व त्यामुळे बाधित व्यक्तिंचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोविड-19 रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बाल कामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांमध्ये ओढली जाण्याची शक्यता पाहता बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हापातळीवर गठीत करण्यात आलेले कृती दल या अनाथ झालेल्या मुलांचा आधारस्तंभ म्हणून कार्य करणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
आज दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी गठीत कृतीदलाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. या दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती प्रसाद कुलकर्णी, नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे, जिलहा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, मालेगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र चौधरी, पोलीस निरीक्षक संगीता निकम, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शुभांगी बेळगावकर, परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव, चाईल्ड लाईन समन्वयक प्रविण आहेर, प्रणित तपकिरे, सुवर्णा वाघ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेली मुले ही बालकामगार, बेकायदेशीर दत्तक वा मानवी तस्करीस बळी पडू नये तसेच कोविडमुळे दोन्ही पालकांना उपचाराकरीता रुग्णालयामध्ये दाखल असतील व बालकांचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नाही, अशा वेळी बालकांना तात्पुरता निवारा अथवा उपचारा दरम्यान दोन्ही पालकांचा मृत्यु होवून अनाथ झालेल्या बालकांना संपूर्ण संरक्षण, संगोपन व पुनर्वसन करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कतेने आणि संवेदनशीलरित्या काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिल्या आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे लहान मुलांवर होणारे संभाव्य धोके लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या समन्वयाने जिल्ह्यात लहान मुलांच्या अनुषंगाने कोविड केअर सेंटरर्स व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्सची निर्मिती करण्यात यावी. यासोबतच पालकांनी देखील आपली मुले या तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाला बळी पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोरोना नियमांचे काटेकोरपणे मुले पालन करतील याकडे पालकांनी अधिक लक्ष्य द्यावे त्यांना प्रशिक्षित करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केले.

			








