विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाची ही दुसरी लाट अनेकांना बाधित करत आहे. आणि बाहेर परिस्थिती इतकी वाईट आहे की, अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे जिथून मिळेल तिथून मदत घेतली जात आहे. तर काहीजण सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन करत आहेत. यापैकीच एक आहे भाेजपुरी आणि बॉलीवूड अभिनेत्री संभावना सेठ. दिल्लीची रहिवासी असलेल्या संभावनाचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांना कुठेही बेड मिळत नाही. यामुळे तिने याबाबत समाज माध्यमांवर बेड मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संभावनाने मदत मागितली आहे. दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यासाठी कोणी माझी मदत करेल का? हे हॉस्पिटल माझ्या घराच्या जवळ आहे. माझे वडील कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांना कुठेही बेड मिळालेला नाही. सध्या ते माझ्या भावासोबत रुग्णालयाच्या बाहेर उभे आहेत. या पोस्टमध्ये संभावनाने डॉ. कुमार विश्वास आणि भाजप कार्यकर्ता कपिल शर्मा यांनाही टॅग केले आहे. या भावनिक आवाहनानंतर, तिच्या चाहत्यांनी वडिलांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.









