विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक महापालिकेने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने लहान मुलांवर कोरोनाचे उपचार करण्यासाठी १०० बेडच्या रुग्णालयाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. तशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत देखील विविध पातळीवर काम करण्यात येत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाची तिसरी येणारी लाट लक्षात घेता त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने आताही साधन सामग्रीचे नियोजन केले जात आहे.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे. मात्र त्या आजाराने लहान मुले प्रभावित झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.
बिटको रुग्णालयात टप्प्याटप्प्याने १०० बेड करण्याची व्यवस्था महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे. त्यास अनुषंगीक साधनसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाग्रस्त बालकांसाठी रुग्ण सेवा देण्यासाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली आहे.