नाशिक – कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली असतानाच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून केंद्रासह राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. तिसर्या लाटेदरम्यान नाशिकमध्ये सक्रिय रुग्णसंख्या ८० हजारांवर जाण्याची शक्यता असून, त्यापैकी २८ हजार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने केलेल्या या भाकितामुळे जिल्हा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्ह्यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी संभाव्या तिसऱ्या लाटेदरम्यान वाढत्या सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात आरोग्य पायाभूत सुविधा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. नाशिकमध्ये दुसर्या लाटेपेक्षा तिसर्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या १५० टक्के वाढण्याची शक्यता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान २९ एप्रिलला सर्वाधिक ५२,९५४ सक्रिय रुग्ण होते. आरोग्य विभागाच्या भाकितानुसार तिसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यात हा आकडा ७९,४३१ रुग्णसंख्या जाण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, तिसऱ्या लाटेच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत सक्रिय रुग्णांपैकी २७,८०१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे. त्यापैकी जवळपास ५० टक्के (१३९००) रुग्णांना नाशिक आणि मालेगावमधील जिल्हा रुग्णालय तसेच महापालिकांच्या रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासणार आहे.
जिल्हा यंत्रणा सज्ज
सक्रिय रुग्णांपैकी ५५६ रुग्णांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्याची तर, ५५६ रुग्णांना व्हेंटिलेटर बेडची गरज भासू शकते. गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याचे हे प्रमाण ८ टक्के असेल. राज्य सरकारकडून आलेल्या सूचनांनंतर तिसर्या लाटेसाठी सज्ज राहण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. त्याबाबतचे नियोजन लवकरच कळविले जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.