नवी दिल्ली – हळूहळू आटोक्यात येतो आहे, असे वाटत असतानाच कधी कोरोना उसळी मारेल सांगता येत नाही. आताही काहीसे तसेच झाले आहे. कोरोना संक्रमण कमी होते आहे, असे आकडे दाखवत असले तरी पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असून तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर 10 टक्के आहे, अशा जिल्ह्यांची संख्या देशात वाढती आहे. सध्या तरी हे प्रमाण केरळ आणि पूर्वोत्तर राज्यांपुरते मर्यादित आहे.
ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन आठवड्यात ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घाट झाली आहे, ही बाब दिलासादायक असली तरी दुसरीकडे 10 टक्के संक्रमण असलेले जिल्हे वाढत आहेत. ही तिसरी लाट जरी नसली तरी ही त्याच्या आधीची स्टेज मानली जाऊ शकते. दरम्यान, आरोग्य मंत्रालय सध्या सगळ्या परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे.
10 टक्के संक्रमण असलेल्या जिल्ह्यांची संख्या 47 वरून 54
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार संक्रमण वाढलेल्या 54 जिल्ह्यांमध्ये 10 केरळचे, मणिपूर – 10, नागालँड – 7, मिझोराम मेघालय -प्रत्येकी 6, अरुणाचल प्रदेश – 5, राजस्थान – 4, सिक्कीम – 2, हरियाणा, दमण, दीव, आसाम आणि पुडूचेरी येथील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे. मणिपूर, केरळ, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये १० टक्क्यांहून अधिक संक्रमण असलेल्या जिल्ह्यांची संख्या वाढली आहे तर राजस्थानमध्ये कमी झाली आहे.
१० जिल्हे झाले कमी तर १५ जिल्हे वाढले
१६ जुलै रोजी ज्या 47 जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक संक्रमण होते, त्यातील आठ जिल्ह्यांमधील संक्रमण १० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे तर नवीन १५ जिल्हे वाढले आहेत.
रुग्ण संख्येत वाढ चिंताजनक
केवळ संक्रमण दरच नाही, तर रुग्णसंख्येतील वाढही चिंतेचे कारण ठरते आहे. देशातील २२ जिल्हे असे आहेत, जिथे नवीन रुग्णांची संख्या वाढती आहे. यात केरळचे ७, मणिपूरचे ५, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशचे प्रत्येकी तीन, महाराष्ट्रातील दोन तर आसाम आणि त्रिपुरातील एकेक जिल्ह्याचा समावेश आहे. संक्रमणाचा वेग गेल्या काही दिवसांत कमी होता, तो आता वाढत असल्याने चिंतेत वाढ होत आहे. पाच ते अकरा मे या काळात दिवसाला जवळपास पावणे चार लाख रुग्ण सापडत होते.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात हे प्रमाण दिवसाला ४८ हजार, इतके खाली होते. पण, त्यानंतर काही हे प्रमाण खाली आलेले नाही. गेल्या ३ आठवड्यांपासून दिवसाला सरासरी ३८ हजार रुग्ण सापडत आहेत. लसीकरणाशी संबंधित कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही.के. पाल यांच्या मते, १० टक्क्यांहून अधिक संक्रमण असलेल्या जिल्ह्यांची संख्या वाढणे हा योगायोग असू शकतो. पण जेथे संक्रमण कमी होते, अशा जिल्ह्यांमध्ये अचानक प्रमाण वाढणे, हे चिंताजनक आहे.