नवी दिल्ली – कोरोना महामारीची तिसरी लाट येणे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. पुढील आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या वाढणे सुरू होईल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. परंतु तिसरी लाट ही दुसऱ्या लाटे इतकी धोकादायक नसेल. तिसऱ्या लाटेत अति प्रतिकूल परिस्थितीतही दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत एक चतुर्थांश असेल. दुसऱ्या लाटेच्या गंभीरतेबाबत भविष्यावाणी करणारे कानपूर आयआयटीचे संशोधक मणिंद्र अग्रवाल आणि त्यांच्या पथकाने सांख्यिकी मॉडेलच्या सूत्राच्या आधारावर हा दावा केला आहे.
ऑक्टोबरमध्ये उच्चांक
कानपूरमध्ये अग्रवाल आणि आयआयटी हैदराबादमधील एम. विद्यासागर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी अभ्यास करून अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या संशोधनानुसार, तिसर्या लाटेत ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक होऊ शकतो. यादरम्यान सामान्य परिस्थितीत एक लाखाहून कमी आणि प्रतिकूल परिस्थितीत दररोज दीड लाखापर्यंत रुग्ण वाढू शकतात. दुसर्या लाटेचा उच्चांक बिंदू असताना ७ मेस रुग्णसंख्या चार लाखांवर पोहोचली होती.
केरळ आणि महाराष्ट्राकडे लक्ष
केरळ आणि महाराष्ट्रासारखे अधिक संसर्ग दर असणार्या राज्यांमुळे संशोधकांचा हा अंदाज बिघडू शकतो. या अंदाजात लसीकरण अभियानाला वेग देण्यासह कोरोना हॉटस्पॉट त्वरित शोधून काढण्यावर भर देण्यात आला आहे. डेल्टासारखा व्हेरिएंट आल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर नजर ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
निष्काळीजीपणाबाबत चिंता
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर प्रतिबंध शिथील केल्याने दुकाने, व्यवसाय, बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे एकच गर्दी होत आहे. लोकांच्या निष्काळजीपणाबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. पहिला लाट ओसरल्यानंतर लोकांचा असाच निष्काळजीणा दिसून आला होता. त्यांनतर दुसर्या लाटेची परिस्थिती सर्वांच्याच समोर आहे.
अशी टाळता येईल तिसरी लाट
मणिंद्र अग्रवाल आणि त्यांच्या पथकाने सांख्यिकी मॉडेलच्या सूत्राच्या आधारावर एक दिलासादायक अंदाजही वर्तविला आहे. त्यानुसार, सामाजिक आणि व्यावसायिक व्यवहार सुरू झाल्यानंतरही लोकांनी मास्क घालणे, शारिरीक अंतर राखणे, स्वच्छ हात धुणे असे नियम जरी पाळले तरी या महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्णसंख्या कमी होऊन २५ हजारांच्या खाली येऊ शकते. परिणामी तिसरी लाट खूपच मर्यादित राहू शकते. सध्या दररोज ४० ते ४१ हजार रुग्ण आढळत आहेत