विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
वयस्कर लोकांप्रमाणेच लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होतो आहे. जवळपास २० ते २२ टक्के मुलांमध्ये संसर्गाचा धोका आहे. याला आयसीएमआरने एका अभ्यासात दुजोरा दिलेला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ते म्हणाले, १०० पैकी २० मुलांना संसर्गाचा धोका आहे. वयस्कर लोकांना कोरोनातून वाचविण्यासाठी अवलंबलेली पद्धत मुलांनाही वाचविण्यासाठी लागू होईल. घाबरून जाण्याऐवजी आपली आणि आपल्या कुटुंबाची नियमांनुसार योग्य काळजी घेतली तर कोरोनापासून बचाव करता येणार आहे.
तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांना किती धोका आहे, याबाबत डॉ. पॉल यांनी कोणतीच माहिती दिली नाही. अशी लाट येणार की नाही याबाबत सध्या काही सांगता येऊ शकत नाही. सिंगापूरहून असा कोणता स्ट्रेन आला आहे की नाही याबाबतही काहीच माहिती मिळू शकलेली नाही, असे पॉल यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये अनेक मुले कोरोनाबाधित होत आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणेच कर्नाटकमध्ये तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. पहिल्या लाटेदरम्यान ९ मार्च ते २५ सप्टेंबर २०२० दरम्यान १९,३७८ इतके १० वर्षांपेक्षा लहान मुले कोरोनाबाधित आढळले होते. ११ ते २० वर्षांचे ४१,९८५ रुग्ण आढळले होते. परंतु आता १ ते १६ मेदरम्यान १९ हजार लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. दहा वर्षांच्या मुलांना पोटदुखीची तक्रार, अन्य त्वचारोगाची लक्षणे दिसत आहेत.
याबाबत पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. पॉल म्हणाले, की आयसीएमआर वेळोवेळी मुलांबाबत माहिती देत आहे. १८ वर्षांखालील मुलांना लस देण्यासाठी केंद्राने भारत बायोटेकला परीक्षणाचे परवानगी दिली आहे. येत्या दोन आठवड्यात हे परीक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे लोकांनी सध्या आपल्या कुटुंबाजी काळजी घेण्याची गरज असल्याचे पॉल यांनी स्पष्ट केले.