विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गाचा सामना करणाऱ्या देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. मे महिन्याच्या मध्यापासून अखेर पर्यंत कोरोनारुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात होणार आहे, असे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ गगनदीप कांग यांनी सांगितले. सध्या कोरोना ज्वर उच्च पातळीवर पोहोचला आहे. या महिन्यात एका दिवसात चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच चार हजार लोकांचा मृत्यूही झालेला आहे. रुग्णसंख्येची वाढ इतक्या वेगाने होत आहे की एका आठवड्यातच २५ लाख रुग्ण आढळले आहेत.
गगनदीप कांग म्हणाले, सध्या कोरोना संसर्गाची आणखी एक किंवा दोन लाट येण्याची शक्यता आहे. म्हणजेच नव्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. परंतु परिस्थिती आतासारखी हाताबाहेर जाणार नाही. संसर्ग अशा क्षेत्रांमध्ये पसरत आहे, जे पूर्वीच्या लाटेत वाचले आहेत. मध्यम वर्गात आणि ग्रामीण भागात वेगाने प्रसार होत आहे. परंतु या भागात संसर्ग दीर्घकाळ टिकण्याची शक्यता कमीच आहे.
एका वेबिनारला संबोधित करताना कांग यांनी चाचण्या कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सध्या संसर्ग झालेले जितके रुग्ण आढळत आहेत, त्यापेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे. कोरोनाची आणखी एक-दोन लाट येण्याची शक्यता आहे, मात्र ती कधी येईल हे सांगता येणार नाही. कोरोना विषाणूबाबत कोणालाच अधिकची माहिती नाहीये. आणि पुढे काय होऊ शकते याचा अंदाजाही लावता येणे कठिण आहे. त्यामुळे सतर्क राहणे एवढेच आपल्या हातात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्गाची लागण लोकांना सारखी झाल्यास तसेच लसीकरण झाल्यास लोकांमध्ये त्याच्याविरुद्धची प्रतिकारक शक्ती वाढेल. त्यामुळे सहाजिकच तो साध्या सर्दी-पडशासारखाच होईल. वातावरण बदलल्यावर होणार्या सर्दी-पडशासारखाच त्याचा परिणाम राहील. कोरोना विषाणू आपले रूप सारखे बदलत आहे. त्यामुळे तो रोगप्रकारक शक्तीलाही मात देऊ शकतो. याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला बूस्टर डोसची गरज आहे.