विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाचा संसर्गाचा उच्चांक बिंदू (पिक पॉइंट) तीन ते पाच मेदरम्यान येऊ शकतो. त्यानंतर देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते, असे विश्लेषण केंद्र सरकारच्या तज्ज्ञ सल्लागार गटाने केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशात गेल्या दहा दिवसांपासून दररोज कोरोनारुग्णांची संख्या तीन लाखांवर आढळत आहे. शुक्रवारी (३० एप्रिल) हा आकडा ३.८६ लाखांच्या वर गेला आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. देशात ऑक्सिजन, औषधे, साहित्यांचा तुटवडा भासत आहे.
जगभरातून भारताला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. संसर्गावर नजर ठेवणार्या तज्ज्ञांच्या गटाचे प्रमुख एम. विद्यासागर यांच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाचा उच्चांक बिंदू पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. आधी याच गटाने उच्चांक बिंदू पाच ते दहा मेदरम्यान येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता.
देशात जुलै किंवा ऑगस्टमध्ये संसर्गाचा उच्चांक बिंदू येण्याच्या अंदाजाला आम्ही गांभीर्याने घेत नाही आहोत. सध्याची लाट लवकरच ओसरेल. परंतु आधीसारखे खूपच कमी रुग्ण आढळत राहतील आणि परिस्थिती नियंत्रणात असेल, असा आमचा अंदाज आहे, असे विद्यासागर म्हणाले.
कोरोनाच्या या लाटेच्या परिणामाला चार ते सहा आठवडे तोंड द्यावे लागणार आहे. यादरम्यान रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत राहणार आहे. पण आवश्यक काळजी घेतल्यास हळूहळू रुग्णसंख्या कमी होत जाईल. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मोठा आराखडा आखण्याची गरज नाही. सध्या कोरोनापासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे आहे तेच करावे. कारण सध्या कोरोनापासून बचाव करण्याचीच ही वेळ आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत तिप्पट रुग्ण
भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये एका दिवसात जास्तीत जास्त ९७,८९४ रुग्ण आढळले होते. तर सध्याच्या परिस्थितीत रुग्णसंख्या त्याच्या तिप्पट आढळत आहे. त्यामुळे गणितीय अंदाजानुसार, उच्चांक बिंदू अधिक दूर नाहीये. या अंदाजांना बरे होण्याचा दरही बदलू शकतो. त्यामुळे चांगले दिवस दूर नाहीत, असे समजावे.