नवी दिल्ली – गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अनेक अर्थांनी वेगळी ठरत आहे. पहिली लाट त्वरित संसर्ग होण्यासह घातक होती. आता दुसरी लाट वेगाने संसर्ग होणारी परंतु कमी घातक आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत आहे. मात्र त्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी आहे. लॅसेंट कोविड-१९ कमिशन इंडिया टास्क फोर्सच्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
दुसऱ्या लाटेत मृतांची टक्केवारी कमी आयएएनएस या वृत्तसंस्थेने लॅसेंट कोविड-१९ कमिशन इंडिया टास्क फोर्सच्या अहवालाचा हवाला देऊन सांगितले, की फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान रोजचे आकडे १० हजारांहून ८० हजारांपर्यंत पोहोचण्यासाठी ४० दिवसांहून कमी वेळ लागला. गेल्या सप्टेंबरमध्ये पहिल्या लाटेदरम्यान ८३ दिवसांत रोजची रुग्णसंख्या आताएवढीच होती. परंतु रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांची टक्केवारी पहिल्या लाटेपेक्षा कमीच आहे.
मृत्यू वाढणार
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मृतांची टक्केवारी १.३ टक्के होती. या वर्षी संसर्ग झालेल्या रुग्णांची टक्केवारी ०.८७ टक्केच आहे. यावरून स्पष्ट होते, की दुसर्या लाटेत कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे, मात्र मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. पण रुग्णांची वाढती संख्या पाहिल्यास दररोजच्या मृतांची संख्याही वाढणार आहे.
प्रभाव मर्यादित क्षेत्रात
गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबरला आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ७५ टक्क्यांहून अधिक रुग्ण ६० ते १०० जिल्ह्यांमध्ये होते. दुसर्या लाटेचा प्रभाव मात्र २० ते ४० जिल्ह्यांतच आहे. त्यामुळे दुसर्या लाटेचा फैलाव मर्यादित क्षेत्रात वेगाने होत आहे असल्याचे स्पष्ट होत आहे.
लक्षणे नसलेले अधिक
लॅसेंटच्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसर्या लाटेत कमी लक्षण असलेले किंवा लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आढळत आहे. मृत्यूदरही याच कारणामुळे कमी झाला आहे. रुग्णांचे ट्रेसिंग चांगले होत असल्याने लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी वेगाने होत असल्याने संसर्ग गंभीर रूप धारण करू शकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हवेद्वारे प्रसार
कोविड विषाणू हवेद्वारे पसरत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे बचावासाठी मास्क वापरण्यासह संपूर्ण चेहर्याला झाकणे महत्त्वाचे आहे. विषाणू नाक, तोंड आणि डोळ्यांवाटे शरीरात प्रवेश करू शकतो. बंद खोलीपेक्षा हवेशीर जागेत थांबणे अधिक सुरक्षित आहे.
निर्बंधांचा पर्याय
देशातील कोणत्याच राज्यात पूर्ण लॉकडाउन लावण्याची शिफारस टास्क फोर्सने केलेली नाही. त्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लावण्याचा सल्ला दिला आहे. लॉडाउनमुळे शहरांमधील हातावरचे पोट असणार्या मजुरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध लावणेच योग्य ठरेल, असे सांगण्यात आले आहे