विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये आता परिस्थितीत सुधारणा होत आहे. काही राज्यात संसर्गाचा दर ५ टक्क्यांहून कमी झाला आहे. तर दिल्ली आणि झारखंडमध्ये तो दोन टक्क्यांहून खाली आला आहे. नऊ राज्यांमध्ये १० टक्क्यांच्या मध्ये आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन लावण्याचे अधिकार सर्व राज्यांना दिलेलेल आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आधीच लॉकडाउन लावण्यात आले होते. गेल्या दीड महिन्यानंतर देशात कमी रुग्ण आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमध्ये लॉकडाउन वाढविला जाणार आहे.
दिल्ली आणि केरळमध्ये संचारबंदीत वाढ
दिल्लीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदीला येत्या ७ जूनपर्यंत सकाळी पाच वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नायब राज्यपाल अनिल बैजय यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत दोन प्रकरणात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केरळ सरकारकडून शनिवारी (२९ मे) राज्यात लागू असलेल्या लॉकडाउनला ९ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलप्पुरम जिल्ह्यात ट्रिपल लॉकडाउन मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पिनापाई विजयन यांनी सांगितले.
बिहार
बिहारमध्ये ५ मेपासून लॉकडाउन सुरू आहे. आधी १५ मे आणि नंतर १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला होता. आता लॉकडाउन पुन्हा वाढणार की निर्बंध शिथिल करणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये संचारबंदी १ जूनपासून हळूहळू शिथिल करण्यात येणार आहे. निर्बंध शिथिल करताना लोकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. बेजबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
झारखंड
झारखंडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. येथे ३ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला असला तरी १ जूनला मुख्यमंत्री हेमंत सोरेन अनलॉकवर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
गोवा
गोव्यात कोरोना संचारबंदीला ७ जूनपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
तामिळनाडू
तामिळनाडूनमध्ये ३१ मेपर्यंत लागू केलेला लॉकडाउन वाढत्या प्रादुर्भामुळे ७ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ही घोषणा केली आहे.
नागालँड
नागालँडमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पूर्ण लॉकडाउन ११ जूनपर्यंत वाढविला आहे. आधी १४ मे ते ३१ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला होता.
जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये लॉकडाउन ३१ मेपासून पुढे वाढविण्याची शक्यता आहे. परंतु पुढील आठवड्यात काही आर्थिक व्यवहारांना लॉकडाउनमधून सवलत मिळू शकते.
राजस्थान
राजस्थानमध्ये लॉकडाउनचा कालावधी ८ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्ग कमी झाला, त्या राज्यात शिथिलता देण्याची शक्यता आहे.
पंजाब
पंजाबमध्ये कोरोना निर्बंध १० जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे वाहनांमध्ये प्रवाशांची मर्यादा वाढविण्याची शक्यता आहे. चंदीगडमध्ये रात्रीची आणि वीकेंड संचारबंदी ३१ मेपर्यंत सुरू असेल.
उत्तर प्रदेश
राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीत एकमत झाले.१ जूनपासून उद्योग आणि दुकाने सुरू करण्याबाबत दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. रात्रीची संचारबंदी सर्व जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे