नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने न भुतो ना भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. त्यामध्ये गेल्या वर्षीचे विक्रम मागे पडत आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट किती दिवस चालणार आहे, दुसर्या लाटेत मृतांचा आकडा कुठपर्यंत पोहोचणार आहे, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक रुग्ण एक लाखापेक्षा कमी आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्या वेगाने खालीसुद्धा आली होती. परंतु पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. इतर देशांमध्ये आढळणार्या रुग्णांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताजा आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात १७६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर एकूण मृतांचा आकडा वाढून १,८०,५३० वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
मे मध्ये तीव्रता कायम
वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख डॉक्टरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत भाष्य केले आहे. कोरोनाची दुसरी लाट पुढील महिन्यात किंवा त्यापेक्षा थोडा अधिक कालावधीत कमी होणार असल्याचे मॅक्स हेल्थकेअरचे संचालक रॉमेल टिक्कू यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितले. मेच्या मध्यापर्यंत किंवा मे अखेरपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख चढाच राहणार आहे, त्यानंतर रुग्ण हळूहळू कमी होतील, असे ते म्हणाले.
तरुणांमध्ये निष्काळजीपणा
ज्या वेगाने रुग्णांचे आकडे वर गेले आहेत त्याच वेगाने ते कमी होतील. परंतु तोपर्यंत लोकांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे. या लाटेत कोरोनाचा संसर्ग तरुणांना अधिक होत आहे. कामावर जाणार्या तरुणांचे प्रमाण अधिक असून ते सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक करतात. सुटीमध्ये बाहेर फिरणे, जल्लोष करणे यामध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग असतो. आपल्याला काहीच होत नाही, असा भ्रम तरुणांमध्ये अधिक आहे, असे ते म्हणाले. पूर्वी कोरोना संसर्ग झाल्यानंतर सहा-सात दिवसांत त्याचे परिणाम दिसत होते. परंतु दुसर्या लाटेत चार-पाच दिवसातच कोरोनाच संसर्ग होत आहे.