नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे दोन वर्षाच्या कोरोना काळात अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी विमा संदर्भात दावे दाखल केले होते, परंतु अनेक विमा कंपन्यांनी ते दावे फेटाळले होते. विमा नियामक प्राधिकरण अर्थात IRDA ने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आता कोरोना काळात विमा कंपन्यांनी नाकारलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो पॉलिसीधारकांना दिलासा मिळू शकतो.
कोरोनाच्या काळात आरोग्य विमा कंपन्यांनी 46 टक्के दावे नाकारले. सदर दावे हे आरोग्य विमा उद्योगातील सरासरी क्लेम सेटलमेंटच्या जवळपास 50 टक्के आहे, त्या अत्यंत गरीब असलेल्या दावे धारकांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयात विमा कंपन्यांविरुद्ध जनहित याचिका दाखल केल्यानंतर, IRDA ने कोविड-19 च्या फेटाळलेल्या दाव्यांवर विचार करण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे ही जनहित याचिका मानव सेवा धाम नावाच्या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती. याचिकेत उच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना कोविड-19 शी संबंधित दावे मनमानीपणे नाकारण्यापासून रोखण्याचा आदेश मागितला होता. विमा कंपन्या COVID-19 शी संबंधित दावे चुकीच्या पद्धतीने नाकारत असल्याचा आरोप पीआयएलमध्ये करण्यात आला आहे. कोविड-19 मुळे विमा कंपन्यांकडे दाव्यांची संख्या वाढली आहे. जीवन विमा नसलेल्या कंपन्यांकडून केवळ 80,000 दाव्याचे अर्ज प्राप्त झाले.
या याचिकेत असे म्हटले आहे की, कोरानाच्या दुसर्या लाटेत, विमा कंपन्यांनी मार्च 2021 पर्यंत अतिरिक्त कोविड आरोग्य विमा संरक्षण असलेले केवळ 54 टक्के दावे निकाली काढले आहेत. त्यामुळे 46 टक्के दावे फेटाळण्यात आले. तसेच विमा क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमा क्षेत्रातील सरासरी दावे 90 टक्क्यांहून अधिक असल्याने ही आकडेवारी धक्कादायक आहे.
कोरोना हेल्थ इन्शुरन्स योजनेंतर्गत एकूण 14,680 कोटी रुपयांचे दावे करण्यात आले असताना केवळ 7,900 कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. बाकीचे दावे कोणतेही ठोस कारण न देता मनमानीपणे फेटाळण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. याशिवाय, विमाधारकाकडे सर्वसमावेशक विमा पॉलिसी असूनही, विमा कंपन्यांनी रुग्णालयात कोविड-19 च्या उपचारासाठी खर्च केलेल्या एकूण रकमेपैकी केवळ 45 ते 80 टक्के रक्कम दिली.
जनहित याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, विमा कंपन्यांनी कोविड-19 चे बहुतांश दावे अयोग्य मार्गाने नाकारले. अशा परिस्थितीत प्रीमियमची रक्कम कुठे गेली, याचाही तपास व्हायला हवा. प्रीमियमची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरून आणि एजंटांना भरघोस कमिशन देऊन कंपन्या संशयास्पद गुंतवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Covid 19 Period Mediclaim Insurance Company Reject IRDA Corona