मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या व्हेरियंटची नावं सुद्धा घाबरवून सोडणारी आहेत. ओमायक्रॉन, क्रॅकेन या नावांमुळे धडकी भरावी, अशी स्थिती आहे. क्रॅकेन हा तर कोरोनाचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरियंट आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेत या व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
कोरोनाची तिसरी लाट तशी भारतात फार जाणवली नाही. पण, आता नव्या व्हेरियंटच्या प्रसारामुळे कोरोनाची चौथी लाट येऊ लागली आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. सध्या भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचेच रुग्ण आढळत आहेत. पण अमेरिकेत मात्र क्रॅकेन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. खरं तर हा काही नवा व्हेरियंट नाही. एक्सबीबी १.५ या व्हेरियंटलाच क्रॅकेन असे म्हटले जाते. कोरोनासारखीच याची सर्वसामान्य लक्षणे आहेत. वेगळ्या स्वरुपाची लक्षणे अद्याप तरी क्रॅकेनच्या रुग्णांमध्ये आढळून आलेली नाहीत.
शास्त्रज्ञांनीच हे नाव दिलेले आहे. घाबरून जाण्याचे कारण नसले तरीही ज्या वेगाने हा व्हेरियंट अमेरिकेत पसरतोय, त्यामुळे लोकांना भीती वाटणं स्वाभाविक आहे. संसर्गाचे प्रमाण अमेरिकेत वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा विशेष अॅलर्टवर आहे. लसीकरणानंतर कोरोना होण्याची भिती नाही, असे बोलले जात होते. पण, तीनवेळा लस घेणाऱ्या लोकांनाही क्रॅकेनने पकडले आहे. त्यामुळे लोकांमध्ये अधिकच धास्ती निर्माण झाली आहे.
भारतात प्रमाण कमी
अमेरिकेत जवळपास ४४ टक्के लोकांना क्रॅकेनचा संसर्ग झाला असून युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियात क्रॅकेन अस्तित्वात आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात मात्र अद्याप या व्हेरियंटने आपला रंग दाखवलेला नाही. पण भविष्यात संसर्ग वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. संपूर्ण भारतात सध्या या व्हेरियंटचे केवळ सातच रुग्ण असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
Covid 19 Kraken Variant Rapid Infection Vaccination
Corona Health XBB USA America