मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सध्या एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याबाबत आरोग्याच्या सर्व संस्थांना सर्वेक्षण वाढविण्याच्या आणि उपचाराबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती, आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.
आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले की, एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा वाढत्या प्रादुर्भावाचा राज्यातील सर्व स्तरावर सतत आढावा घेण्यात येत आहे. राज्यात सर्व स्तरावर सनियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी यांची व्हीसीद्वारे आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा घेऊन केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाहीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पुर्नप्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आहे.
राज्यात गंभीर आजारी, वृद्ध नागरिक, अतिजोखमीच्या व्यक्ती, गरोदर माता व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा व महानगरपालिकांना स्थानिक स्तरावर लस खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सन २०२२-२३ मध्ये ९९.७७८ लोकांना लस देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार लस उपलब्ध ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर अनुदान देण्यात आलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात १ जानेवारी २०२३ पासून २० मार्च २०२३ पर्यंत एच१ एन१ चे एकूण बाधित रुग्ण ४०७ तर एच३एन२ चे बाधित रुग्ण २१७ रुग्ण आढळून आलेले आहेत. या आजारा बाबत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा तसेच रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी ऑसेलटॅमीवीर हे औषध शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध आहे. तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. याबरोबरच काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याची आढावा बैठक घेऊन कोविड प्रतिबंधक जीवनशैली बाबत जनतेचे प्रबोधन करण्याचे निदेश दिले आहेत. राज्य शासन कोविड उपचाराबाबत दक्ष आहे. त्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन करण्यात येत असल्याचेही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.
Covid 19 H3N2 Enfluenza Infection Health Department Alert Mode